तज्ज्ञांचा सवाल : दहावीनंतर कौशल्ये वाढीवर भर देणे गरजेचे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर जाहीर झालेला यंदाचा दहावीचा निकाल म्हणजे अनेक विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक ठरला आहे. यंदाचा निकाल पाहता अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या नगण्य आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आणखी एक सकारात्मक दिशा प्राप्त होण्याची शक्यता आहे. यामुळे शिक्षणातील दहावीनंतरच्या गळतीलाही तात्पुरता थांबा मिळेल, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते आणि तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. दरम्यान, असे असले तरी अकरावीनंतरच्या कौशल्यवाढीसाठी मात्र शासन आणि विद्यार्थ्यांनी आतापासूनच कंबर कसली पाहिजे, अशा प्रतिक्रियाही ते व्यक्त करत आहेत.
ग्रामीण भागात बालमजुरी, बालविवाहांचे प्रमाण वाढले आहे. घरची परिस्थिती, सामाजिक-आर्थिक स्थितीचे परिणाम, यामुळे मुलांचे शैक्षणिक आणि सामाजिक नुकसान हाेत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. दोन वर्षे शाळा बंद असल्याने या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा मार्ग त्यांच्यासाठी बंदच आहे. त्यातच दहावीत अनुत्तीर्ण झाल्याचा शिक्का बसला असता तर या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहातून कायमचेच बाहेर पडावे लागले असते, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी दिली. त्यामुळे दहावीचा यंदाचा निकाल अशा गरीब, अर्थार्जनासाठी झगडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक आणि त्यांची तात्पुरती गळती थांबविणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, असे असले तरी त्यांना त्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी स्वतःची कौशल्ये वाढविण्यावर, पुढील वर्गातील अभ्यास करताना दहावीच्या उजळणीवर भर द्यायला हवा, असे त्यांनी सुचविले आहे.
अकरावीचे वर्ष लवकर सुरू करावे
शासनाने अकरावी प्रवेश प्रक्रियेत जास्त वेळ न दवडता जितक्या लवकर शक्य होईल, तितक्या लवकर अकरावीचे वर्ष सुरू करावे आणि पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्याप्रमाणे ब्रीज कोर्स सुरू केला आहे, तशी व्यवस्था या विद्यार्थ्यांसाठी करावी,असे सुचविले आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या शैक्षणिक काळात आवश्यक कौशल्ये आत्मसात करता येतील आणि स्पर्धात्मक युगात टिकून राहता येईल, असे मत त्यांनी मांडले आहे. दहावीनंतरचा शैक्षणिक प्रवास हा त्यांच्या अभ्यासपूर्ण कौशल्यावर त्यांची त्या क्षेत्रात निवड करून देणारा ठरत असतो. त्यामुळे व्यावसायिक, पारंपरिक अभ्यासाची उजळणी ही त्यांना संजीवनी देणारी ठरेल, असे मत काही मुख्याध्यापकही व्यक्त करीत आहेत.