Join us  

मुंबईतील २३६ प्रभागांच्या फेररचनेचा मसुदा आठवड्याभरात तयार होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2021 5:20 AM

लोकसंख्येच्या आधारावर मुंबई महापालिकेत नगरसेवकांची संख्या वाढविण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. याबाबतचा अध्यादेश मुंबई महापालिकेला प्राप्त झाला आहे. त्यानुसार २३६ प्रभागांच्या फेररचनेचा मसुदा तयार करण्यात येत आहे. हा मसुदा आठवड्याभरात राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे.

मुंबई : लोकसंख्येच्या आधारावर मुंबई महापालिकेत नगरसेवकांची संख्या वाढविण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. याबाबतचा अध्यादेश मुंबई महापालिकेला प्राप्त झाला आहे. त्यानुसार २३६ प्रभागांच्या फेररचनेचा मसुदा तयार करण्यात येत आहे. हा मसुदा आठवड्याभरात राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर आरक्षण सोडत व हरकती व सूचना मागविण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगामार्फत होणार आहे. मात्र यासाठी आणखी महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेत २२७ प्रभाग असून, यामध्ये आणखी नऊ प्रभागांची भर पडणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईतील लोकसंख्या वाढल्यामुळे त्या आधारे प्रभागांची फेररचना केली जाणार आहे. प्रभाग वाढविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात आला. मात्र जवळपास एक महिन्यानंतर याबाबतची अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यामुळे आता २३६ प्रभाग वाढविण्यात आल्यानंतर सर्व प्रभागांचे पुन्हा सीमांकन करून सुधारित मसुदा तयार करण्यात येत आहे. लोकसंख्येच्या आधारे फेररचना केल्यानंतर पूर्व उपनगरात चार, तर पश्चिम पाच प्रभाग वाढणार आहेत.

 प्रक्रियेसाठी एक महिन्याचा कालावधी

या फेररचनेबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून नियमावली महापालिकेला पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेला मसुदा राज्य निवडणूक आयोगाकडे एका आठवड्यात पाठविण्यात येणार आहे. प्रभागांची सुधारित रचना करणे आणि त्यावरील हरकती व सूचना आदींसाठी किमान २५ ते ३० दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे प्रभागांची रचना झाल्यानंतर प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया यासाठी एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारी २०२२ मध्ये अपेक्षित पालिका निवडणूक पुढे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पालिकेमार्फत तयारी सुरू

कोविडच्या पार्श्वभूमीवर २०२१ मध्ये अपेक्षित जनगणना घेण्यात आलेली नाही. त्यामुळे २०११ मधील जनगणनेच्या आधारे प्रभागांची फेररचना केली जाणार आहे. निवडणुकीसाठी मतदारांची यादी तयार करणे, मनुष्यबळाची चाचपणी, मतदान केंद्राची तयारी पालिकेमार्फत सुरू आहे.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिकानिवडणूक