लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना रुग्णसंख्येचा आलेख हिरव्या रेघेखाली येऊ लागल्याने निर्बंधात शिथिलता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला खरा; पण ही शिथिलता म्हणजे मुक्त संचारासाठी मिळालेली मुभा आहे की काय, असे चित्र सध्या मुंबईत सर्वत्र पाहायला मिळत आहे. रस्ते, बाजारपेठांत तुफान गर्दी होत असून, कोरोना प्रतिबंधक नियमांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मुंबईकरांना नियमभान कधी येणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोना हद्दपार झाल्याशिवाय त्याच्या विळख्यातून आपली सुटका होणार नाही. त्याचे समूळ उच्चाटन करायचे असेल तर प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावेच लागेल, असे आरोग्य तज्ज्ञांकडून वारंवार सांगितले जात आहे. परंतु, मुंबईकर त्याकडे पुरते दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. निर्बंधात शिथिलता दिल्यापासून नियमभंग करणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. रस्त्यावरून चालताना, प्रवास करताना, मार्केटमध्ये बहुतांश नागरिक सोशल डिस्टन्सिंग, मास्कबाबतचे नियम पाळत नाहीत.
पालिकेचे पथक कोणकोणत्या ठिकाणी तैनात असते, हे इतक्या महिन्यांत मुंबईकरांना तोंडपाठ झाले आहे. त्यामुळे या पथकाचे कार्यक्षेत्र वगळता इतरत्र मास्कचा वापर फारसा होताना दिसत नाही. विशेष म्हणजे फेरीवाल्यांसह बरेच दुकानदारही मास्क हनुवटीखाली ओढून ग्राहकांशी संवाद साधताना आढळले. उद्याने, मैदाने आणि इतर सार्वजनिक ठिकाणीही अशीच स्थिती आहे.
येत्या काही दिवसांत मंदिरे आणि सिनेमागृहांची दारे उघडली जाणार आहेत. तेथेही अशाप्रकारे नियमोल्लंघन होत राहिल्यास कोरोना पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मंदिर व्यवस्थापन आणि सिनेमागृह चालकांनी नियम न पाळणाऱ्या नागरिकांना प्रवेश देऊ नये, तरच कोणत्याही खंडाविना ती अविरतपणे सुरू राहतील, असे मत सुजाण नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
बाजारातील गर्दीला कोण आवरणार?
ऑगस्टपासून मुंबईतील बाजारपेठा पुन्हा गर्दीने फुलू लागल्या आहेत. सणासुदीचा काळ वगळता इतर दिवशी होणारी गर्दी चिंतेचा विषय आहे. दादर, लालबाग, भायखळा, मशीद बंदर आणि अन्य प्रमुख बाजारपेठांत सकाळ आणि सायंकाळी होणाऱ्या अनावश्यक गर्दीला वेळीच आवर न घातल्यास ती कोरोना प्रसाराची मुख्य केंद्रे बनतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.