Join us  

मुंबईतील निर्बंध जैसे थे; पहिल्या टप्प्यात येऊनही तिसऱ्या टप्प्याचे नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 7:02 AM

पालिकेची सावध भूमिका : गेल्या आठवड्यात मुंबईतील पॉझिटिव्हिटीचा दर ४.४० टक्के होता. तो शुक्रवारी ३.७९ टक्के झाला. मुंबईतील निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार मुंबई पालिकेला दिलेले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना पॉझिटिव्हिटीच्या दरात घट झाल्याने राज्य सरकारच्या निकषानुसार मुंबईचा पहिल्या टप्प्यात समावेश झाला आहे. महापालिकेने मात्र सावधगिरी बाळगत मुंबईत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पॉझिटिव्हिटीचा दर एक टक्का आणि दररोजची रुग्ण संख्या पाचशेहून कमी झाल्यास मुंबईत दुसऱ्या टप्प्याचे निर्बंध लागू करण्याचा विचार करू, असे मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले. त्यामुळे  सर्वसामान्यांसाठी तूर्त लोकल सेवा खुली होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

गेल्या आठवड्यात मुंबईतील पॉझिटिव्हिटीचा दर ४.४० टक्के होता. तो शुक्रवारी ३.७९ टक्के झाला. मुंबईतील निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार मुंबई पालिकेला दिलेले आहेत. मात्र, चार आठवड्यांत तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे पॉझिटिव्हिटीचा दर एक टक्क्यावर येईपर्यंत मुंबई पूर्णपणे खुली करता येणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. तिसऱ्या टप्प्यात मुंबईतील दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, हॉटेल, मॉल्स, चित्रपटगृह आदींवर निर्बंध आहेत. पुढच्या आठवड्यात पॉझिटिव्हिटीचा दर आणखी कमी झाल्यास दुकाने पूर्णवेळ व रेस्टॉरंट, व्यायामशाळा आदी ५० टक्के उपस्थितीत सुरू होऊ शकतात.

सर्वप्रथम महिलांना लोकल प्रवासाची परवानगी लोकलमधून रोज सरासरी ८२ लाख लोक प्रवास करतात. मागच्या वेळी पुनश्च हरिओम केल्यानंतर पहिल्यांदा महिलांना व नंतर ठरावीक वेळेत सर्वांना प्रवासाची परवानगी दिली होती. या वेळीही मुंबई दुसऱ्या टप्प्यात आल्यास प्रथम महिलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.धारावीत एका बाधिताची नोंद : गेले सलग तीन दिवस धारावीत एका कोरोना बाधिताची नोंद झाली आहे. येथील कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असून, आता येथे केवळ पाच सक्रिय रुग्ण आहेत.

कल्याण-डोंबिवलीत निर्बंध शिथिलठाणे शहर, नवी मुंबईपाठोपाठ आता कल्याण-डोंबिवलीदेखील दुसऱ्या स्तरात आली आहे. यामुळे येथील मॉल, सिनेमागृहे सुरू होणार असून, दुकाने आणि हॉटेलची वेळ रात्रीपर्यंत वाढणार आहे.

‘सावधान तिसरी लाट येतेय; गर्दी करू नका’लसीकरणाचा कार्यक्रम जितक्या वेगाने पुढे जायला हवा होता तितका तो गेला नाही. त्यात आता नागरिक निर्बंध झुगारून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करीत आहेत. अशा स्थितीत कोरोनाचा विषाणू नव्या स्वरूपात आपल्यासमोर येत आहे. त्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता अधिक आहे. या लाटेचा सामना करण्यासाठी सर्वांत प्रभावी शस्त्र हे मास्क आहे. त्याला पर्यायच नाही, असे मत राज्याच्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी व्यक्त केले आहे.

मुंबईत आजही बाधित रुग्णांची दररोजची संख्या ७५० ते ८०० आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर एक टक्के आणि दैनंदिन रुग्णांची संख्या पाचशेहून कमी होत नाही, तोपर्यंत मुंबई तिसऱ्या टप्प्यातच राहील.- इक्बाल सिंह चहल, आयुक्त, मुंबई महापालिका

पुढील आठवड्यात कोणते निर्बंध राहतील, याचा निर्णय शनिवारी घेण्यात येईल. सर्व गोष्टींचा विचार करून टप्प्याटप्प्याने निर्बंध दूर केले जातील. मात्र, तज्ज्ञांनी दोन - चार आठवड्यांत तिसरी लाट येईल, असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे लोकल प्रवासासाठी तूर्तास प्रतीक्षा करावी लागणार आहे.- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या