Join us

मेट्रोतून मांसवाहतूक करण्यास बंदी कायम

By admin | Updated: August 30, 2016 04:01 IST

एका प्रवाशाला मेट्रोतून मासे घेऊन जाण्यास मुंबई मेट्रो वनच्या सुरक्षा रक्षकांकडून नकार देण्यात आल्याची बाब समोर आली.

मुंबई : एका प्रवाशाला मेट्रोतून मासे घेऊन जाण्यास मुंबई मेट्रो वनच्या सुरक्षा रक्षकांकडून नकार देण्यात आल्याची बाब समोर आली. मात्र कायद्यानुसारच मेट्रोतून मांस वाहतुकीला बंदी असल्याची भूमिका मेट्रो प्रशासनाने मांडली आहे. वर्सोवा येथून अंधेरीला मेट्रोने जाण्यासाठी एक प्रवासी मासे घेऊन वर्सोवा स्थानकात आला. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्याला हटकले आणि फलक दाखवत मेट्रोतून मासे घेऊन जाण्यास बंदी असल्याचे सांगितले. हे प्रकरण समोर आल्यानंतर मुंबई मेट्रोने आपली भूमिका स्पष्ट करत मेट्रोच्या कायद्यातच तशी तरतुद असल्याचे सांगितले आहे. मेट्रो ही वातानुकूलित सेवा असून मांस किंवा मासे नेताना अन्य प्रवाशांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळेच ही बंदी असल्याची भूमिका मांडली आहे. याविषयी मेट्रो प्रवाशांमध्येही जनजागृती केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मनसेकडून मेट्रोच्या या भूमिकेविरोधात आंदोलन करण्यात आल्यानंतरही कायद्यातच तशी तरतुद असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.