मुंबई : अंधेरी येथील लोटस बिझनेस पार्क आगीत शहीद झालेल्या नितीन इवलेकर या अग्निशामक दलातील जवानाच्या मृत्यूस मुंबई महापालिका आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप नॅशनल फायर फायटर्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष शरद राव यांनी केला आहे. या सर्व अधिका:यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात खटले दाखल करणार असल्याची माहिती राव यांनी गुरुवारच्या पत्रकार परिषदेत दिली.
आग विझवण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा मुंबई अग्निशमन दलाकडे उपलब्ध असतानाही त्याचा योग्य वापर न केल्याने जवानाचा मृत्यू झाल्याचा दावा राव यांनी केला. ते म्हणाले, ‘आगीत कर्मचारी गुदमरून मरू नयेत, म्हणून बी.ए. (ब्रिदींग अॅपॅरेट्स) व्हॅन आणि एरियल लॅडर प्लॅटफॉर्म या दोन यंत्रणांची मदत होते. बी.ए. व्हॅनचा वापर कर्मचारी गुदमरू नये म्हणून केला जातो; तर लॅडरच्या साहाय्याने थेट 18व्या मजल्यार्पयत पोहोचता येते.
दलाकडे 3 बी.ए. व्हॅन आहेत. त्यातील एक अंधेरी, दुसरी विक्रोळी आणि तिसरी भायखळा येथील अग्निशमन केंद्रात आहे. आगीच्या वेळी अंधेरी येथील बी.ए. व्हॅनवर कर्मचारी नसल्याने तिचा वापर करता आला नाही, असेही राव यांनी सांगितले. 3 ऑगस्टला फेडरेशनने कर्मचा:यांच्या जीविताच्या सुरक्षेच्या प्रश्नावर परळ येथील शिरोडकर सभागृहात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे (प्रतिनिधी)
तर जवान काम करणार नाही
‘प्रत्यक्ष नियमावलीनुसार आगीचा सामना हा केंद्र अधिका:याच्या नेतृत्वाखाली करायचा असतो. मात्र अंधेरी येथील घटनेत केंद्र अधिकारी उशिरा दाखल झाले. केंद्र अधिकारी गैरहजर असेल, तर जवानही अग्निशमनचे काम करणार नाही,’ असा निर्णय घेणार असल्याचे राव यांनी सांगितले.