तलासरी : येथील बाजारपेठेमध्ये असलेल्या पोस्ट कार्यालयातील अवजड तिजोरी काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी लांबविली. ही तिजोरी तलासरी पोलिसांनी शोधून काढली. मात्र, पोलिसांच्या ताब्यात असलेली तिजोरी न्यायालयाकडून सोडविण्यासाठी पोस्ट विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून हालचाल होत नसल्याने सध्या तलासरी पोस्ट कार्यालयाचा कारभार तिजोरीविना सुरू आहे.तिजोरी नसल्याने अनेक अडचणींचा सामना पोस्टमास्तरांना करावा लागत आहे. पोस्टाची तिकिटे तिजोरीत अडकल्याने आणि नवीन तिकिटांचा पुरवठा करण्यात न आल्याने तलासरीत पोस्ट तिकिटांची टंचाई निर्माण झाली आहे. याशिवाय, तिजोरी नसल्याने पोस्ट कार्यालयात जमा होणारी रोकड पोस्टमास्तरांना जवळ बाळगावी लागत आहे. पोस्टाची रोकड ३ वाजेपर्यंत बँकेत जमा करून त्यानंतर जमा होणारी रोकड जवळ बाळगावी लागत असल्याने पोस्टमास्तरांना जीव मुठीत धरून काम करावे लागते.मोडकळीस आलेली पोस्टाची इमारत, चोरांची भीती, तिजोरीविना बाळगावी लागत असलेली रोकड यामुळे सध्या तलासरी पोस्ट कार्यालयातील कर्मचारी प्रचंड तणावाखाली काम करीत आहेत. पण, याचे कसलेही सोयरसुतक वरिष्ठ अधिकाऱ्यांना असल्याचे दिसत नाही. (वार्ताहर)
तलासरी पोस्टाचा कारभार तिजोरीविना
By admin | Updated: November 10, 2014 00:52 IST