Join us  

‘ती’ जबाबदारी केईएमच्या विभागप्रमुख व अधिक्षकांचीच!, वैद्यकीय संचालक व नेत्रतज्ज्ञ डॉ. लहाने यांचे आक्षेप

By अतुल कुलकर्णी | Published: February 13, 2019 1:45 AM

'बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये डोळ्याच्या आॅपरेशननंतर पाच जणांचे डोळे गेले, या प्रकरणाची जबाबदारी केईएमच्या विभागप्रमुख आणि रुग्णालय अधिक्षकांचीच आहे, कारण त्यांनी भारत सरकारच्या ‘कोड आॅफ कंडक्ट’चे पालन केले नाही'

मुंबई : बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये डोळ्याच्या ऑपरेशननंतर पाच जणांचे डोळे गेले, या प्रकरणाची जबाबदारी केईएमच्या विभागप्रमुख आणि रुग्णालय अधिक्षकांचीच आहे, कारण त्यांनी भारत सरकारच्या ‘कोड ऑफ कंडक्ट’चे पालन केले नाही अशी खळबळजनक माहिती प्रख्यात नेत्रतज्ञ व वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी लोकमतशी बोलताना दिली.विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्टÑ’ मोहीम सुरु केली त्या काळातच हे प्रकरण घडले असले तरी पालिका मुख्यालयात बसणाऱ्या वरिष्ठ अधिकाºयांनी या प्रकरणी केईएम रुग्णालयाच्या वरिष्ठांवर कारवाई न करता ठाकरे हॉस्पीटलमधील डॉक्टरांचा बळी देणे सुरु केल्याची माहितीही समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑपरेशन नंतर रुग्णांना इन्फेक्शन झाले. त्यावेळी तातडीने उपचार करणे आवश्यक होते. मात्र तब्बल १८ ते १९ दिवस हे रुग्ण केईएममध्ये उपचार घेत राहीले. या काळात तिथल्या डॉक्टरांनी कोणत्या रेटीना तज्ञांचा सल्ला घेतला?, मुंबईत केंद्रीय नेत्रचिकित्सा संस्था जे.जे. हॉस्पीटलमध्ये कार्यरत असताना त्यांच्याशी कधी चर्चा केली का?, जेवढे दिवस हे रुग्ण केईएममध्ये दाखल होते त्या काळात त्यांच्यावर कोणते उपचार केले?, ठाकरे हॉस्पीटल आणि केईएममध्ये ऑपरेशन थिएटर आणि वॉर्ड निर्जंतुकीकरण करण्यासाठी कोणत्या औषधांचा वापर केला?, हे काम करणाºया एजन्सी किंवा ठेकेदारांनी कोणती औषधे वापरली व त्यांच्याकडे यासाठीचा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग होता का? या प्रकारानंतर वरिष्ठ व तज्ञांची चौकशी समिती केली का? केली असेल तर त्यांनी कोणता अहवाल दिला. त्यात कोणाला दोषी ठरवले? या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अजूनही समोर आलेली नाहीत.याबाबत संचालक डॉ. लहाने यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या घटनेनंतर रेटीना तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे होते.जर केईएममध्ये रुग्ण प्रतिसाद देत नव्हते तर त्यांना जे.जे. मध्ये आणायला हवे होते. ज्या ठिकाणी डोळ्याचे आॅपरेशन होते ती जागा निर्जंतुकीकरण करण्यासाठी केंद्र सरकारचे कोड आॅफ कंडक्ट आहे. ते पाहण्याची जबाबदारी तिथल्या विभागप्रमुखांची व रुग्णालय अधिक्षकांची असते. त्यांनी हे तपासूनच शस्त्रक्रिया केल्या पाहिजेत असा दंडक आहे असेही ते म्हणाले.ठेकदार नामानिराळे ठेवण्यासाठी धडपड?

महापालिकेने हॉस्पीटल सफाईचे काम खाजगी ठेकेदारांना दिले आहे. आयसीयू आणि आॅपरेशन थिएटर निर्जंतुकीकरणासाठी सुक्ष्मजंतूनाशकांचा वापर यासाठी केला पाहिजे असे केंद्राचे नियम सांगतात. यासाठीच्या टेंडरमध्ये काय, कशी, किती व कधी काम करावे याचा तपशिल आहे मात्र हे काम किती लोकांनी करायचे, त्यांना कशाचे प्रशिक्षण असावे, त्यांनी यासाठी कोणते साहित्य वापरावे यासाठीचे उल्लेख नाहीत.

रुग्णांना इन्फेक्शन झाल्यास हेवी अ‍ॅन्टीबायोटिक्स दिली जातात. त्यांच्या अतीवापरामुळे काहीकाळाने कोणतीही अ‍ॅन्टीबायोटिक रुग्णांवर परिणामच करत नाही, हे पाहून हॉस्पिटलमधील हायरिस्क एरियासाठी डिसइन्फेक्टंन्ट वापरले पाहिजेत, असे ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने म्हटले आहे. मात्र पालिकेच्या निविदेत या सगळ्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. याची चौकशी सुरु झाली तर अनेक बडे अधिकारी अडकतील म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे एक ज्येष्ठ अधिकारी म्हणाले.

टॅग्स :हॉस्पिटल