राजेंद्र वाघ, शहाडसापांविषयी असलेल्या गैरसमजामुळे साप दिसल्यावर त्याला मारण्यात येते. वास्तविक, साप हा पर्यावरणाच्या जीवनचक्रातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे सर्वांनी नागपंचमीला साप वाचवण्याचा संकल्प करावा, असे आवाहन सर्पमित्रांतर्फे केले जात आहे.नागपंचमीच्या दिवशी सापाचे निवासस्थान समजल्या जाणाऱ्या वारुळाची पूजा केली जाते. सापाला दूध पाजले जाते. वास्तविक, साप दूध पीत नाही. सापाची शरीररचना मांसाहारी असल्याने तो दगावतो. शेतकऱ्यांचा मित्र म्हणून सापाची ओळख आहे. शेतकरी व शेतीसाठी उपद्रवी ठरणाऱ्या उंदरांना साप खातो. त्यामुळे अन्नधान्याचे नुकसान होत नाही. भारतात सापाच्या २७८ जाती आहेत. यापैकी काही बिनविषारी, विषारी व काही सौम्य विषारी आहेत. मात्र, बिनविषारी सापांचे प्रमाण जास्त आहे. यात नाग, मण्यार, घोणस, फुरसे, रातसर्प, पोवळा व समुद्रसाप हे विषारी आहेत. मांजऱ्या, हरणटोळ, रेतीसर्प आदी सौम्य विषारी व धामण, मांडूळ, कवड्या, गवत्या, धूळनागीन, पाणदिवड, चित्रांक, नायकूळ व डुरक्या इत्यादी बिनविषारी साप आहेत. ठाणे जिल्ह्यात २३ प्रकारचे साप आढळतात.
करा साप वाचवण्याचा संकल्प
By admin | Updated: August 1, 2014 03:07 IST