Join us

‘संकल्प करा प्लॅस्टिक आणि कचरामुक्त मुंबईचा’, व्हीआरव्हीच्या वतीने स्वच्छतेची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 05:52 IST

वर्सोवा बीचवर रोज जमा होणा-या कच-याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आॅक्टोबर २०१५ पासून शनिवार आणि रविवार असे ९८ आठवडे वर्सोवा रेसिडेन्ट व्हॉलेंटियर्स (व्हीआरव्ही) च्या वतीने स्वच्छतेची मोहीम राबविण्यात येत आहे.

मुंबई : वर्सोवा बीचवर रोज जमा होणा-या कच-याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आॅक्टोबर २०१५ पासून शनिवार आणि रविवार असे ९८ आठवडे वर्सोवा रेसिडेन्ट व्हॉलेंटियर्स (व्हीआरव्ही) च्या वतीने स्वच्छतेची मोहीम राबविण्यात येत असून, संस्थेचे जनक अ‍ॅड. अफरोज शाह यांच्या पुढाकाराने कोणतीही राजकीय मदत न घेता ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. वर्सोवा कोळीवाड्यातील राजहंस टपके आणि प्रवीण भावे यांनी या कामी पुढाकार घेतला असून, या मोहिमेचा आदर्श घेतला तर मुंबई नक्कीच प्लॅस्टिक आणि कचरामुक्त होईल, असा आशावाद संबंधितांनी व्यक्त केला आहे.अमेरिकेचे पर्यावरण प्रमुख इरिक सोहिलीम हे खास गेल्या वर्षी महात्मा गांधी जयंतीनिमित्त देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीतील अंधेरी (प.) येथील वर्सोवा बीचवर मोहिमेत भाग घेण्यासाठी उपस्थित झाले होते. त्यांनी रविवारच्या पावसात सुमारे १ हजार नागरिकांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. व्हीआरव्ही आणि कोळी बांधवांनी राजकीय पक्षाची मदत न घेता हे काम केल्याने त्यांनी या कामाचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये अफरोज शाह यांच्या या स्वच्छता मोहिमेचे कौतुक केले होते. व्हीआरव्हीचे नरेश सुरी, अमित सुरवसे, नरेश केसवानी, डॉ. चारूल भानजी, प्रवीण भावे, मोहित रामले, सारिका साठी, पराग भावे यांच्यासह दर शनिवार आणि रविवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत सुमारे २५० कार्यकर्ते या वर्सोवा बीच स्वच्छता मोहिमेत सहभागी होतात.राज्य आणि केंद्र सरकारने प्रत्येक बीचवर प्लॅस्टिकवर प्रक्रिया करणारे प्लॅस्टिक व्हेंडिंग मशीन उपलब्ध करून दिले पाहिजे. डम्पिंग ग्राउंडवरील प्लॅस्टिकचे विघटन केल्यास नवे उद्योगधंदे उभारून रोजगार उपलब्ध होतील. शिवाय प्लॅस्टिकला आळा बसेल, असे येथील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. स्वच्छता मोहिमेत वाळूत ५ फूट खोल कचºयाच्या ढिगामध्ये प्लॅस्टिक, बॅग, चादरी, गोण्या, जुने कपडे, बूट आढळतात. हा सर्व कचरा या स्वच्छता मोहिमेपूर्वी मातीत गाडला गेला होता; तो आता गेल्या सुमारे दोन वर्षांत या स्वच्छता मोहिमेमुळे कमी झाला आहे.