Join us

बसभाडेवाढीला बेस्ट सदस्यांचा विरोध

By admin | Updated: February 3, 2015 00:21 IST

आर्थिक तूट वसूल करण्यासाठी एकीकडे मुंबईकरांवर भाडेवाढ लादणाऱ्या बेस्ट उपक्रमाने आठ बसमार्ग बंद केले आहेत़

मुंबई : आर्थिक तूट वसूल करण्यासाठी एकीकडे मुंबईकरांवर भाडेवाढ लादणाऱ्या बेस्ट उपक्रमाने आठ बसमार्ग बंद केले आहेत़ याचे तीव्र पडसाद बेस्ट समितीच्या बैठकीत आज उमटले़ भाडेवाढ अमलात आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी आवाज उठवून आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे़ रविवारपासून मुंबईतील बसभाडे वाढविण्यात आले आहे़ काँग्रेसचे शिवजी सिंह यांनी प्रशासनाबरोबर सत्ताधारी शिवसेनेवर तोफ डागली़ केंद्र व राज्यात शिवसेना-भाजपा युती असताना बेस्ट उपक्रमाची दोन वेळा भाडेवाढ होत आहे़ फेब्रुवारीनंतर पुन्हा एप्रिलमध्ये भाडेवाढ करण्यास त्यांनी विरोध दर्शविला़ भाडेवाढ करताना बस फेऱ्यांमध्ये कपात करणे अन्यायकारक असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला़ विरोधी पक्ष आक्रमक होताच अडचणीत आलेल्या शिवसेनेने बाजू सावरून धरण्यासाठी बेस्ट प्रशासनाला फटकारले़ वातानुकूलित बस मार्ग तोट्यात असताना दोन नवीन वातानुकूलित बसमार्ग सुरू करण्याचे प्रयोजन काय, असा जाब शिवसेनेचे सुहास सामंत यांनी विचारला़ (प्रतिनिधी)