Join us  

राजीनाम्याचा अंक आणि स्पष्टीकरणाचा पडदा..!, ४ ऑगस्टला निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 7:32 AM

अजित भुरे व विजय केंकरे यांनी मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाच्या, अनुक्रमे अध्यक्षपदाचा व उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर निमंत्रित सदस्यांसह निर्माता संघाच्या कार्यकारिणीची बैठक बोलाविण्यात आली.

- राज चिंचणकरमुंबई : मराठी नाट्यसृष्टी एकीकडे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ठप्प झाली असतानाच, मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघातल्या घडामोडींमुळे मात्र नाट्यमय प्रवेश सुरू झाले आहेत. निर्माता संघाच्या कार्यकारिणीचे विसर्जन, राजीनामासत्र, आरोप-प्रत्यारोप आदी घटनांनी सुरू झालेल्या या प्रयोगात; राजीनाम्याचा अंक आणि स्पष्टीकरणाचा पडदा असे नाट्य रंगले आहे.अजित भुरे व विजय केंकरे यांनी मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाच्या, अनुक्रमे अध्यक्षपदाचा व उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर निमंत्रित सदस्यांसह निर्माता संघाच्या कार्यकारिणीची बैठक बोलाविण्यात आली. विजय केंकरे यांनी अध्यक्षस्थान भूषविलेल्या या बैठकीतील चर्चेनंतर विद्यमान कार्यकारिणी विसर्जित करण्यात आली आणि येत्या ४ आॅगस्ट रोजी मुदतपूर्व निवडणूक घेण्याचे निश्चित करण्यात आले.दरम्यानच्या काळात, निर्माता संघाचे सदस्य असलेल्या १0 निर्मात्यांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसले. लता नार्वेकर, श्रीपाद पद्माकर, नंदू कदम, राकेश सारंग, अनंत पणशीकर, चंद्रकांत लोकरे, सुनील बर्वे, प्रशांत दामले, महेश मांजरेकर, दिलीप जाधव यांनी; निर्माता संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या कथित कार्यपद्धतीला कंटाळून संस्थेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले. अजित भुरे व विजय केंकरे यांनी त्यापूर्वीच त्यांच्या पदांचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. वैजयंती आपटे यांनीही त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता.मात्र या निर्मात्यांनी राजीनामा देताना केलेल्या कथित आरोपांवरून मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाचे काळजीवाहू प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे यांनी आता मौन सोडले आहे. कथित निधीवाटपावरून रंगलेल्या या नाट्यात त्यांनी स्पष्टीकरणांची भलीमोठी यादी देत आरोपांचे खंडन करण्याचा प्रयत्न केला आहे. एकूणच या सगळ्या घडामोडींमुळे, निर्माता संघ अचानक चर्चेत आला आहे. आता ४ आॅगस्ट रोजी मुदतपूर्व निवडणूक घोषित झाली आहेच; त्यामुळे या निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे नाट्यसृष्टीचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :नाटक