वसई : वसई-विरार शहर मनपाच्या हा प्रभाग तालुक्याच्या पश्चिम भागाच्या ग्रामीण भागात आहे. गिरीज, सालोली व भुईगाव मधील काही परिसराचा या प्रभागामध्ये समावेश आहे. पूर्वीला तिन्ही गावे ग्रामपंचायत क्षेत्रात होती. या तिन्ही ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती कमकुवत होती. त्यामुळे अनेक विकासकामे मार्गी लागू शहत नव्हती. साडेचार वर्षापूर्वी महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर मात्र भरीव आर्थिक निधी उपलब्ध झाला व विकासकामांना चांगली गती मिळाली.गेल्या साडेचार वर्षामध्ये रस्ते, गटारे, सार्व. शौचालये व समाज मंदीर उभारणी इ. विकास कामे झपाट्याने मार्गी लागली. त्यासाठी सुमारे ४ कोटी खर्च झाल्याचा दावा होतो आहे. ग्रामीण भागातील जनतेचा महानगरपालिकेत ग्रामीण भागातील गावांचा समावेश करण्यास प्रचंड विरोध होता. परंतु आर्थिक निधी अभावी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास कामे मार्गी लागू शकत नाहीत हे वास्तव झालेल्या विकास कामावरून स्पष्ट झाले. अनेक विकास कामे मार्गी लागली असली तरी पाण्याचा प्रश्न सुटू शकलेला नाही. कोट्यवधी रुपये खर्चून जलकुंभ उभारण्यात आला. परंतु पाणीपुरवठा मात्र अद्याप सुरू झालेला नाही. स्थानिक रहिवाशांच्या विहिरी व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेल्या बोअरींगमुळे पाणी टंचाईची झळ या परिसराला बसली नाही. परंतु भविष्यात मात्र पाण्याची समस्या अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. या प्रभागातून निवडून झालेल्या ज्योती हेमंत पाटील व पूर्वी सालोली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच होत्या. त्यांनी नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर या प्रश्नी सातत्याने पाठपुरावा केला. (प्रतिनिधी)
पाण्याच्या प्रश्नाने रहिवासी त्रस्त
By admin | Updated: March 29, 2015 22:32 IST