मुंबई : राष्ट्रवादीतील काही आमदार आणि मंत्रीही यावेळी उमेदवारी नको असे म्हणत आहेत असे सांगून सरसकट सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज फेटाळून लावली.
आमच्याकडे आमदार असणारे काही लोक यावेळी नको म्हणत आहेत. त्यात मंत्रीही आहेत आणि अगदी माङया बाजूला बसलेलेही आहेत, असे ते सांगत पवार यांनी बाजुला बसलेल्या आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्याकडे बोट दाखवले. आम्ही 144 जागांच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत, पण अंतिम निर्णय आमचे आणि काँग्रेसचे नेते दिल्लीत घेतील, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, युतीमध्ये भाजपा मोठा भाऊ की शिवसेना असा वाद सुरू असला तरी आघाडीमध्ये काँग्रेस हाच मोठा भाऊ आहे. काँग्रेसशिवाय अन्य कोणाशी आघाडी करण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. काँग्रेसने सर्वच जागांवर चाचपणी केली आहे, याकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले, तो त्यांचा अधिकार आहे पण ते पुढे गेले तर मग आम्हीही चूप बसणार नाही. जागावाटपाचा दोन्ही पक्षांचा फॉम्यरुला ठरल्याबरोबर राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर करण्यात येतील.
आमची यादी तयार आहे. नाशिकमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की मनसेला असे दोन पर्याय काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर होते. जातीयवादी पक्षांपेक्षा दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने आम्ही मनसेला पाठिंबा दिला, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)