Join us  

पूरस्थितीतून अंधेरी, जोगेश्वरी, खारवासीयांची होणार सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 10:05 AM

पुलाच्या पुनर्बांधणीसाठी पालिका करणार १० कोटी खर्च.

मुंबई : अंधेरीतील मोरा गाव आणि इरला पम्पिंग स्टेशनला जोडणाऱ्या जेव्हीपीडी जंक्शनजवळील इरला नाला धोकादायक झाल्याने तो तोडून त्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे. पालिकेकडून यासाठी १० कोटी ३१ लाख ९७ हजार ५६० रुपये खर्च केला जाणार आहे. पावसाळा वगळून १५ महिन्यांत नाल्याचे काम पूर्ण करणे ही कंत्राटदाराची जबाबदारी असणार आहे. नाल्याच्या पुनर्बांधकामामुळे पावसाळ्यात पूरस्थितीला सामोरे जाणाऱ्या अंधेरी, जोगेश्वरी, खार परिसरांतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या कामासाठी पालिका १० कोटी ३१ लाख ९७ हजार ५६० रुपये खर्च करणार आहे.

मुंबईतील नालेसफाईसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. काही ठिकाणी नागरिकांना पूरस्थितीला सामोरे जावे लागते. अंधेरी, विलेपार्ले परिसरांतील मोरा गाव आणि इरला पम्पिंग स्टेशनला जोडणाऱ्या जंक्शनजवळील इरला नाल्यात आजूबाजूला वसलेल्या वसाहतींतील नागरिक कचरा फेकत असल्याने नाला कचऱ्याने तुंबतो. 

पावसापूर्वी या नाल्यातील कचरा समाधानकारकपणे साफ न झाल्यास पाण्याचा निचरा होत नाही; त्यामुळे पाणी तुंबून परिसरात पूरस्थिती निर्माण होते. कचरा साफ करण्यासाठी पालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च करूनही नाला तुंबत असल्याने नागरिकांना पूरस्थितीला सामोरे जावे लागते.

 हा नाला जुना असल्याने तो धोकादायक झाला आहे. त्यामुळे पावसात पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी तुंबते. परिसरातील नागरिकांना पूरस्थितीच्या त्रासातून दिलासा देण्यासाठी इरला नाला तोडून त्याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

यामुळे तुंबते पाणी :

 इरला नाला नादुरुस्त झाल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा नीट होत नसल्याने पाणी तुंबते. त्यामुळे हा नाला तोडून पुन्हा बांधला जाणार आहे.

 नाल्याच्या पुनर्बांधकामामुळे के-पश्चिम येथील अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी, आदी परिसरांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. 

 यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून या कामासाठी १० कोटी ३१ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. पावसाळा वगळून १५ महिन्यांत हे काम पूर्ण करावे लागणार आहे.

टॅग्स :मुंबईपूर