ठाणे : मुंब्य्रापासून जवळ दहिसर मोरी भागातील एकता कम्पाउंडमधील कडधान्यांच्या तीन गोदामांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने छापा टाकला. त्यात १२ हजार १२९ मेट्रीक टन तूर, तूरडाळीसह इतर कडधान्यांचा साठा जप्त केला. या मालाची किंमत ११२ कोटी सहा लाख ५८ हजार ७० रुपये आहे. या प्रकरणी ३९ जणांवर गुन्हे दाखल केल्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सांगितले. पोलीस आणि शिधावाटप अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे २७ आॅक्टोबरच्या रात्री ही कारवाई केली. यात तळोजा रोड, दहिसर मोरी, पिंपरी येथील करम वेअर हाऊस गोदामात नऊ हजार ६७२.४१ मेट्रीक टन वजनाची तूर आणि इतर कडधान्याचा ९० कोटी २३ लाख ८६ हजार ७०० रुपयांचा साठा ताब्यात घेतला. गर्ग वेअर हाऊस या पिंपरीतील गोदामातही १४४२.७२५ मेट्रीक टन वजनाच्या डाळी आणि कडधान्याचा १० कोटी नऊ लाख १० हजार २५० रुपये किमतीचा साठा ‘सील’ केला. या प्रकरणी शिधावाटप अधिकारी रत्नदीप तांबे आणि निरीक्षक राजेंद्र जाधव यांच्या फिर्यादीवरून जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)तिसरी कारवाई पनवेल रोडवरील ओम वेअर हाऊस, करम वेअर हाउसिंग प्रा.लि. या पिंपरीतील गोदामांवर केली. या ठिकाणी १०१४.२४६ मेट्रीक टन वजनाची तूर आणि इतर कडधान्याचा ११ कोटी ७३ लाख ६१ हजार १२० इतक्या किमतीचा साठा ‘सील’ केला. या प्रकरणी शिधावाटप निरीक्षक राजाराम मुळये यांनी शीळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ठाणे पोलिसांची गेल्या १५ दिवसांतील ही दहावी कारवाई असून, आतापर्यंत २२५ कोटींची तूर आणि कडधान्याचा साठा जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दहिसर मोरी भागात ११२ कोटींच्या कडधान्याचा साठा जप्त
By admin | Updated: October 29, 2015 00:39 IST