खातेदार संतापले : सहा महिन्यांतून एक हजार रुपये मिळणारडोंबिवली - येथील सीकेपी बँकेचे संचालक मंडळ गेल्या दोन वर्षांपासून बरखास्त करण्यात आल्याने बँकेत प्रशासक नेमण्यात आला आहे. मात्र शुक्रवारी बँकेने सहा महिन्यांतून एकदाच एक हजार रुपये देण्यात येतील, अशी नोटीस लावल्याने खातेदारांमध्ये गोंधळ उडाला आहे. रिझर्व्ह बँकेने निर्बंध का घातले, याचे उत्तर बँकेच्या अधिकार्यांकडे नसल्याने कर्मचारी व खातेदारांमध्ये वादावादी झाली. डोंबिवली पूर्वेकडे टिळक टॉकीजजवळ सीकेपी बँकेची शाखा आहे. बँकेचे सुमारे ३० ते ४० हजार खातेदार आहेत. दोन वर्षांपूर्वीच सीकेपी बँकेचे संचालक मंडळ रिझर्व्ह बँकेने बरखास्त केले आहे. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने सीकेपी बँकेला ई-मेल पाठवून खातेदारांना सहा महिन्यांतून एकदाच एक हजार रुपये देण्यात यावे, असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, बँकेने खातेदारांना तशी माहिती दिली. सहा महिन्यांतून एकदाच एक हजार रुपये पैसे काढण्यास मिळणार आहेत, हे समजल्यावर बँक कर्मचारी व ग्राहक यांच्यात खटके उडाले. प्रशांत साबळे व सुरेश सुतार या खातेदारांनी बँकेचे व्यवस्थापक उल्हास सूर्यराव यांच्याकडे विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडून कोणतेही अपेक्षित उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आम्ही घरखर्च कसा चालवायचा, असा सवाल खातेदार व पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिकांकडून केला जात आहे.रिझर्व्ह बँकेचा ई-मेल बँकेला प्राप्त झाला आहे. मात्र, निर्बंध का घालण्यात आले आहेत, हे माहीत नाही. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार कार्यवाही करीत असल्याचे सीकेपी बँकेचे व्यवस्थापक उल्हास सूर्यराव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सीकेपी बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध
By admin | Updated: May 4, 2014 14:47 IST