Join us
Daily Top 2Weekly Top 5

हाफकिनमधील संशोधन कामे वेळेत पूर्ण व्हावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हाफकिन संस्थेमध्ये सध्या विविध प्रकल्पांवर संशोधन आणि चाचणीचे काम सुरू आहे. ही सर्व कामे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : हाफकिन संस्थेमध्ये सध्या विविध प्रकल्पांवर संशोधन आणि चाचणीचे काम सुरू आहे. ही सर्व कामे कालबद्धरीत्या पूर्ण होण्यासाठी प्रकल्प प्रमुखांची नेमणूक करण्यात यावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्थेच्या नियामक परिषदेची ५९वी बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली. बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांच्यासह हाफकिन संस्थेच्या संचालिका सीमा व्यास, वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह हाफकिन संस्थेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीच्या प्रगती अहवालाबाबत कार्यवाही होणे अत्यंत आवश्यक आहे. ही कार्यवाही कालबद्ध वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रकल्प प्रमुख नेमण्यात यावा. याशिवाय हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांनी एकत्रपणे येऊन काम करावे. हाफकिनमध्ये सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देण्याबरोबरच प्रस्तावित औषधांची चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्याला गती देण्यात यावी. हाफकिन संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना फेलोशिप आणि पीएच.डी. करण्यासाठीही अधिकाधिक प्रोत्साहन देण्यात यावे, असे देशमुख यांनी सांगितले.

हाफकिन संस्थेसाठी वैद्यकीय शिक्षण संचालकांमार्फत लवकरच एमडी पॅथॉलॉजिस्टची नेमणूक करण्यात येणार असल्याचे परिषदेत सांगण्यात आले. हाफकिन संस्थेने गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत घेतलेल्या निर्णयांना नियामक परिषदेने मंजुरी दिली आहे. याशिवाय या संस्थेतील मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि अधीक्षक ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हाफकिन संस्थेतील एकूण १४ निवासी-अनिवासी इमारतींच्या दुरुस्ती कामांना गती देण्यात यावी, असे निर्देश देशमुख यांनी दिले.