Join us  

उद्योजक प्रशिक्षणासाठी केंद्र उभारण्यासाठी जमीन देण्याची सरकारला केली विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 2:56 AM

जागतिक मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्सचा रौप्यमहोत्सवी समारंभ

मुंबई : मराठी उद्योजकांच्या प्रशिक्षणासाठी मुंबई वा पुण्यात संपर्क केंद्र उभारण्याचे आम्ही ठरविले असून, त्यासाठी सरकारने आम्हाला एक एकर जागा द्यावी, अशी विनंती जागतिक मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी येथे केली.

जागतिक मराठी चेंबर्स आॅफ कॉमर्सच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त यंदा उद्योगक्षेत्रात मोठी कामगिरी केलेल्यांना उद्योगरत्न पुरस्कार देण्यात आले. त्याप्रसंगी आढळराव पाटील म्हणाले की, यापूर्वी आम्ही ही मागणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली होती. आता पुन्हा त्याचा पाठपुरावा करू. या संपर्क केंद्रात प्रदर्शन व प्रशिक्षणाची सोय असेल. या समारंभास लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी, खा. राहुल शेवाळे, दिग्दर्शक महेश कोठारे, सुबोध भावे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी अनंत एंटरप्रायझेसच्या शीला धारिया, बडवे ग्रुप आॅफ कंपनीजचे श्रीकांत बडवे, सौदी अरेबियातील अब्दुल्ला अँड असोसिएट्सचे अशोक वर्तक, श्रीनिवास इंजिनीअरिंगजचे एस. जी. काळे यांचा सन्मान करण्यात आला.

शीला धारिया यांनी आपली कंपनी संरक्षण खात्याच्या एका प्रकल्पात ब्राह्मोस क्षेपणास्त्रासाठी स्प्रिंग पुरवित असल्याची माहिती दिली, तर गेली ४२ वर्षे दुबईत काम करणाऱ्या अशोक वर्तक यांच्या कंपनीने १,१00 प्रकल्प पूर्ण केले आहेत.चित्रपट क्षेत्राला उद्योगाची मान्यता हवीसुबोध भावे यांनी चित्रपट क्षेत्राला उद्योग म्हणून मान्यता मिळाल्यास निर्मात्यांची सोय होईल, असे सांगून मराठी निर्मात्यांकडे स्वत:चे स्टुडिओ नसल्याची खंत व्यक्त केली. आपल्या ‘धूमधडाका’ चित्रपटासाठी सुरेश महाजन या उद्योजकानेच कर्ज दिले होते, असे सांगून विविध भागांतून मुंबईत येणाºया होतकरू कलाकारांसाठी काम करण्याची आपली इच्छा असल्याचे महेश कोठारे यांनी बोलून दाखविले.