Join us

कळवा : एकाच खोलीत भरतात दोन तुकड्यांचे वर्ग

By admin | Updated: April 27, 2015 22:41 IST

एकीकडे महापालिकेच्या काही शाळा भल्यामोठ्या असतांना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची कमतरता आहे.

अजित मांडके ल्ल ठाणेएकीकडे महापालिकेच्या काही शाळा भल्यामोठ्या असतांना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची कमतरता आहे. परंतु, दुसरीकडे कळव्यातील महात्मा फुलेनगर भागात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी केवळ चारच वर्ग असल्याने दोनदोन तुकड्यांमधील विद्यार्थी एकाच खोलीत बसविण्याची नामुष्की या शाळेवर आली आहे. यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार करूनही पालिका प्रशासनाकडून अद्यापही कार्यवाही झालेली नाही. कळव्यातील महात्मा फुलेनगर भागात महापालिकेची एकमेव शाळा आहे. येथील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याच शाळेचा एकमेव पर्याय आहे. २००६ मध्ये या शाळेची सुरुवात झाली. सुरुवातीला अतिशय कमी पटसंख्या असलेल्या या शाळेमध्ये आजघडीला ३८० विद्यार्थी आहेत. वर्ग कमी असल्याने या शाळेत सुरुवातीला पहिली ते सातवीपर्यंतचेच वर्ग भरत होते. या शाळेची अशी परिस्थिती असतानाही गतवर्षी येथे आठवीचा वर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे या शाळेचा ताण अधिकच वाढला आहे. केवळ चारच वर्ग असल्याने पहिल्या आणि दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोनदोन तुकड्या एकाच खोलीत भरत आहेत. त्यामुळे शिक्षकांवरील ताण वाढला आहे. विशेष म्हणजे या शाळेत शिक्षकांची संख्या १२ असली तरी आणखी तीन ते चार शिक्षकांची गरज असल्याचे मत शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केले आहे. वारंवार मागणी करून तीन शिक्षक मिळाले असले तरी त्यातील दोन शिक्षक हे बाहेरून आले असल्याने बदली झाल्यास ते शिक्षकसुद्धा कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे एक मजल्याच्या या इमारतीत तळ मजल्यावर दोन आणि पहिल्या मजल्यावर दोन अशा चार खोल्या आहेत. परंतु, विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता व्यवस्थापनाने मागील वर्षापासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सकाळच्या सत्रात भरविण्यास सुरुवात केली आहे. पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग दुपारच्या सत्रात भरविले जातात.प्रत्यक्षात सकाळ आणि दुपारच्या सत्रात सर्वच वर्ग भरविणे अपेक्षित असताना केवळ खोल्यांच्या अभावामुळे अशा प्रकारे दोन सत्रांत शाळा भरवावी लागत असल्याचे मत शाळेतील सूत्रांनी व्यक्त केले. शाळेच्या वर्गखोल्या वाढविण्यासाठी शाळा व्यवस्थापनामार्फत २०१२ पासून पत्रव्यवहार सुरू आहे. परंतु, त्याला पालिकेकडून केराची टोपली दाखविली जात आहे. त्यातल्या त्यात दोन वर्षांपूर्वी संरक्षक भिंत उभारण्यात आली असून मागील वर्षी शाळेला गेटही बसविण्यात आले आहे. तसेच स्वच्छता चांगली असली तरी टॉयलेटमधील टाइल्स तुटलेल्या आहेत. त्यातही जेव्हापासून ही शाळा सुरू झाली, तेव्हापासून आजतागायत या शाळेची एकदाही रंगरंगोटी करण्यात आलेली नाही. त्यामुळे किमान हे काम तरी प्रशासनाने करावे, अशी शिक्षकांची अपेक्षा आहे.