Join us

नालेसफाईचा दैनंदिन अहवाल द्या

By admin | Updated: May 22, 2014 03:48 IST

पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने त्यापूर्वीच नालेसफाई पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे.

भार्इंदर - पावसाळ्याच्या आगमनापूर्वी नालेसफाईला महापालिकेने सुरुवात केली असली तरी ही सफाई योग्य होते की नाही, त्याबाबतचा दैनंदिन अहवाल सादर करुन संबंधित अधिकार्‍यांनी नालेसफाईच्या ठिकाणी उपस्थित राहिल्याचा फोटोही व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविण्याचे फर्मान आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिले आहेत. आता आयुक्तांच्या या आदेशामुळे अधिकारी संबंधित ठिकाणी उपस्थिती लावीत असल्यामुळे नालेसफाईच्या कामाला आता चांगलाच वेग आला आहे. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने त्यापूर्वीच नालेसफाई पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. शहरातील लहान-मोठे १५३ नाल्यांची सफाई १ मेपासून सुरु केली असून त्यासाठी सुमारे एक कोटी तीस लाखांच्या खर्चाची तरतूद केली आहे. ही सफाई १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार प्रशासानाने व्यक्त केला असून त्यासाठी आयुक्तांनी संबंधित अधिकार्‍यांना नालेसफाईच्या सक्त सूचना दिल्या आहेत. त्यासाठी जुन्या ४ प्रभाग समिती कार्यालयनिहाय विभागणी करण्यात आली असून ६ पोकलेन, ३ बोट पोकलेन, ३५० कामगार, १० स्वच्छता निरीक्षक, ७ जेसीबी, १८ टोरस (आॅटो अनलोड करणारे मोठे डम्पर) ची व्यवस्था केली आहे. नालेसफाईत वेळकाढूपणा अथवा दिरंगाई होऊन त्याचा फटका पावसाळ्यात पाणी साठून पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी या सफाईवर आयुक्तांनी करडी नजर ठेवली आहे. सफाईबाबतचा दैनंदिन अहवाल आरोग्य विभागाला सादर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. संबंधित अधिकार्‍यांनी सफाईच्या ठिकाणी व्यक्तिश: उपस्थित राहून त्यावर देखरेख ठेवण्याचे निर्देशही दिले आहेत. केवळ उपस्थित राहून आपली हजेरी लावणार्‍या अधिकार्‍यांना कर्तव्याची जाण व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे़ (वार्ताहर)