Join us

सेना-भाजपाबद्दल रिपाइंत नाराजी

By admin | Updated: March 26, 2015 00:50 IST

महायुतीच्या नेत्यांनी आपला घटक पक्ष असलेल्या रिपाइंसह इतर मित्रपक्षांच्या नेत्यांना चार हात लांब ठेवल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी युती करण्यासंदर्भात मातोश्री येथे बुधवारी झालेल्या बैठकीत महायुतीच्या नेत्यांनी आपला घटक पक्ष असलेल्या रिपाइंसह इतर मित्रपक्षांच्या नेत्यांना चार हात लांब ठेवल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे.औरंगाबादसह नवी मुंबईत रिपाइंची मोठी ताकद असून, युतीच्या स्थानिक नेत्यांनी रिपाइं मित्र पक्ष असूनही कोणत्याही चर्चेत या पक्षाच्या नेत्यांना दूर ठेवले आहे, नव्हे त्यांचा वारंवार अवमान केला आहे. यामुळे रिपाइंने नवी मुंबईत स्वबळावर ३६ जागा लढविण्याची तयारी केली आहे. तसेच समविचारी पक्षांची मिळून वेगळी मोट बांधण्याची तयारी चालविली आहे. असे असताना बुधवारी राज्यपातळीवरील उद्धव ठाकरे आणि रावसाहेब दानवे यांच्यासारख्या महायुतीच्या नेत्यांनीही रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांना याबाबत विश्वासात न घेतल्याने नवी मुंबईतील स्थानिक रिपाइं कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रिपाइंचा पाठिंबा असलेले नवी मुंबई महापालिकेत दोन अपक्ष नगरसेवक असून ही ताकद भाजपापेक्षा दुप्पट आहे. आता मोदी लाटेत भाजपाचा अनपेक्षितपणे बेलापूर मतदार संघात आमदार निवडून आला असला तरी भाजपापेक्षा रिपाइंची ताकद आणि नेटवर्क नवी मुंबईत सर्वदूर पसरले आहे. विशेषत: झोपडपट्टी विभागात पक्षाची ताकद मोठी आहे. यामुळे महायुतीने रिपाइंला या निवडणुकीत १५ ते १६ जागा द्यायला द्याव्यात, अशी आमची मागणी असल्याचे पक्षाचे नवी मुंबई अध्यक्ष सिद्राम ओहळ यांनी सांगितले. तसेच पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवलेंसह स्वाभिमानी शेतकरी पक्षासह राष्ट्रीय समाज पक्षासही महापालिका निवडणुकांच्या चर्चेत विचारात घ्यायला हवे होते. चर्चेची बुधवारची पहिलीच बैठक असल्याने अजूनही आम्हाला अपेक्षा आहे, अन्यथा स्वबळावर लढण्याचा निर्णय पक्का असल्याचे ते म्हणाले.च्नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीत युतीबाबत मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि रावसाहेब दानवे यांनी चर्चा केली. यावेळी औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम हे उपस्थित असल्याचे सांगतात. च्मात्र, या चर्चेत दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींनी नवी मुंबईतील स्थानिक नेत्यांना विचारात न घेतल्याने शिवसैनिक आणि भाजपा कार्यकर्त्यांनी छुपी नाराजी व्यक्त केली आहे.