Join us

कमांडिंग सेंटर कार्यान्वित होण्यापूर्वीच दुरुस्ती

By admin | Updated: June 23, 2015 01:16 IST

आगीच्या दुर्घटनांचा सामना करण्यास सक्षम सहा कमांडिंग सेंटर्स पालिकेने मुंबईत उभारले खरे़ परंतु फर्निचर आणि मनुष्यबळाच्या प्रतीक्षेत या

मुंबई : आगीच्या दुर्घटनांचा सामना करण्यास सक्षम सहा कमांडिंग सेंटर्स पालिकेने मुंबईत उभारले खरे़ परंतु फर्निचर आणि मनुष्यबळाच्या प्रतीक्षेत या कमांडिंग सेंटरची दुरवस्था झाल्याचे उजेडात आले आहे़ २० कोटी खर्च करून बांधण्यात आलेले मानखुर्द कमांडिंग सेंटर दोन वर्षे असेच धूळ खात पडले आहे़ तरीही यावर पुन्हा पावणेतीन कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर आणण्यात आला आहे़मरोळ, भायखळा, मानखुर्द, वडाळा, बोरीवली, विक्रोळी असे सहा कमांडिंग सेंटर्स बांधण्याचा निर्णय पालिकेने २००५ नंतर घेतला़ मुंबईतील लोकसंख्येच्या तुलनेत अग्निशमन दलाची यंत्रणा तोकडी पडत असल्याने अशा अद्ययावत कमांडिंग सेंटरची संकल्पना मांडण्यात आली़ परंतु गेल्या दहा वर्षांमध्ये कमांडिंंग सेंटर्सच्या इमारती उभ्या राहिल्या, तरी त्या कार्यान्वित होऊ शकलेल्या नाहीत.२० कोटी खर्च करून मानखुर्द येथील कमांडिंग सेंटर २०१३ मध्ये उभे राहिले़ परंतु त्याचा उपयोग करण्यात न आल्यामुळे या सेंटरमधील फर्निचर खराब झाले आहे़ या इमारतीमध्ये आसपासच्या परिसरातील गर्दुल्ले घुसून चोरी करू लागले आहेत़ या गर्दुल्ल्यांचा अड्डाच येथे तयार झाला आहे़ मात्र हे सेंटर कार्यान्वित करण्याऐवजी पालिकेने या इमारतीत दुरुस्तीसाठी आणखी करोडो रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव आणला आहे़