Join us  

पर्यायी मार्र्गांअभावी रखडणार पुलांची दुरुस्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 5:03 AM

​​​​​​​महापालिकेने केलेल्या पाहणीत मुंबईतील १८ पुलांच्या पुनर्बांधणीची आवश्यकता असल्याचे दिसून आले आहे

मुंबई : लोअर परळ येथील डिलाईल पूल पाडण्यात येणार असल्यामुळे पर्यायी मार्गाअभावी नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे अन्य धोकादायक पूल पाडण्यापूर्वी त्या पुलाला पर्यायी मार्ग शोधण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. प्रवासी, पादचारी तसेच वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यानंतरच हे पूल पाडणे व त्यांच्या पुनर्बांधणीला सुरुवात करण्यात येणार आहे. महापालिकेने केलेल्या पाहणीत मुंबईतील १८ पुलांच्या पुनर्बांधणीची आवश्यकता असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी हे धोकादायक पूल जमीनदोस्त करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. मात्र तीन वर्षांपूर्वी पाडलेला हँकॉक पूल अद्याप उभा राहिलेला नाही. त्यामुळे नियोजनाविना धोकादायक पूल पाडल्यास नागरिकांची गैरसोय होईल. म्हणून पर्यायी मार्गाची चाचपणी करण्याची सूचना पालिकेने सल्लागारांना केली आहे.या १८ पुलांच्या पुनर्बांधणीला सुरुवात करण्यापूर्वी लोकांची गैरसोय टाळण्याकरिता कामाचे वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे. चेंबूरचे टिळक नगर पूल, मालाड येथील गांधी नगर पूल आणि मस्जिद पूर्व येथील येलो गेट पादचारी पूल यापूर्वीच तोडण्यात आले. तर उर्वरित १५ पुलांच्या पुनर्बांधणीसंदर्भात पत्रव्यवहार सुरू आहे. यापैकी बहुतांशी धोकादायक पूल हे पादचारी पूल आहेत. तर काही नाल्यांवरील पूल असल्याने वाहतूककोंडीची समस्या निर्माण होणार नाही.६१ पुलांची मोठी दुरुस्तीमुंबईतील २९६ पुलांपैकी ६१ पुलांची मोठी दुरुस्ती तर १०७ पुलांची किरकोळ दुरुस्ती होणार आहे. मात्र लोअर परळ येथील डिलाईल पूल बांधणार कोण, यावरून वाद सुरू असल्याने उर्वरित पुलांची दुरुस्ती रखडली आहे. वेळ वाया जाऊ नये यासाठी पूल तोडणे व बांधण्याचे काम एकाच ठेकेदाराला देण्याचा पालिकेचा विचार सुरू आहे.

टॅग्स :लोअर परेलमुंबई