Join us

पनवेलमध्ये भाडेकरार आता आॅनलाइन

By admin | Updated: November 27, 2015 02:20 IST

शहर आणि सिडको वसाहतीतील फ्लॅटचे भाडेकरार (लिव्ह अ‍ॅन्ड लायसन्स) घरबसल्या करण्याच्या दृष्टीने नोंदणी व मुद्रांक विभागाने पावले उचलली आहे.

प्रशांत शेडगे, पनवेलशहर आणि सिडको वसाहतीतील फ्लॅटचे भाडेकरार (लिव्ह अ‍ॅन्ड लायसन्स) घरबसल्या करण्याच्या दृष्टीने नोंदणी व मुद्रांक विभागाने पावले उचलली आहे. हे भाडेकरार विनावकील आॅनलाइन करण्यास सुरुवात झाली आहे. त्याकरिता एजन्सी नियुक्त करण्याचे काम सुरू आहे. ई-रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून भाडेकरार नोंदवल्यास वकिलांना द्याव्या लागणाऱ्या भरमसाट फीमधून सामान्य नागरिकांची सुटका होणार आहे. जमीन, फ्लॅटची खरेदी-विक्र ी ई-रजिस्ट्रेशनद्वारे करण्याची सुविधा नोंदणी व मुद्रांक विभागाने उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय फ्लॅट भाडेकराराने देताना त्याची नोंदणीही याच पद्धतीने करण्याची सुविधा मुंबई आणि पुणे या महानगरात या अगोदरच देण्यात आली आहे. मात्र,भाडेकरार आॅनलाइन नोंदविण्यास सुरुवातीला या ठिकाणी अत्यल्प प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे इतर ठिकाणी ही यंत्रणा सुरू करण्यास विलंब लागला. मात्र त्यामधील त्रुटी दूर करण्यात आल्या आहेच त्याचबरोबर चांगला प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. पनवेल शहर, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर या भागात फ्लॅट किंवा दुकाने भाड्याने देण्याचे प्रमाण अधिक आहे. फ्लॅट भाडेतत्त्वावर देण्यासाठी सर्वसाधारणपणे अकरा महिन्यांचे करार करण्यात येतात. हे करार करताना नागरिकांचा वेळ वाचावा आणि अधिक सुलभ पद्धतीने प्रक्रि या पार पडावी, यासाठी नोंदणी आणि मुद्रांकशुल्क विभागाने भाडेकरार आॅनलाइन पद्धतीने नोंदवण्याची सुविधा दिली आहे.पुण्यासह मुंबई शहर व उपनगर, तसेच ठाणे या जिल्ह्यांत भाड्याने मिळकती देण्याचे प्रमाण मोठे असल्याने या जिल्ह्यांमध्ये त्यासाठी प्राधान्य देण्यात आले होते. त्यानंतर आता पनवेलमध्ये ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात मुद्रांकशुल्क विभागाने पुढाकार घ्यावा अशी मागणी जोर धरत होती. त्यानुसार ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता शासनाने त्याबाबत सक्ती केल्याने येत्या काळात रजिस्ट्रेशनकरणे बंधनकारक असणार आहेत. त्यानुसार पनवेलमध्ये खाजगी एजन्सी नियुक्त करण्याचे काम सुरू आहे. त्यांच्याकडून निबंधक कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. नवीन पनवेलमध्ये लवकरच एक सेंटर सुरू होणार असल्याची माहिती निबंधक कार्यालयाकडून देण्यात आली.(वार्ताहर)