Join us
Daily Top 2Weekly Top 5

रद्द रिक्षा परवान्यांचे लॉटरी पद्धतीने नूतनीकरण

By admin | Updated: December 7, 2015 01:46 IST

राज्यातील रद्द झालेल्या १ लाख ४0 हजार रिक्षा परवान्यांचे १ आॅक्टोबरपासून काही अटींवर नूतनीकरण करण्यास परिवहन विभागाकडून मान्यता देण्यात आली

मुंबई : राज्यातील रद्द झालेल्या १ लाख ४0 हजार रिक्षा परवान्यांचे १ आॅक्टोबरपासून काही अटींवर नूतनीकरण करण्यास परिवहन विभागाकडून मान्यता देण्यात आली. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने १६ नोव्हेंबर आणि त्यानंतर पुन्हा एकदा ३0 नोव्हेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली. तरीही प्रतिसाद न मिळाल्याने आता १५ डिसेंबर ही अंतिम मुदत परिवहन विभागाने दिली आहे. ही मुदत अंतिम असून, त्या मुदतीत नूतनीकरण न झाल्यास परवाने आता कायमचे रद्द केले जातील. शासनाकडून या परवान्यांच्या फेरवाटपाची प्रक्रियाही सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यानुसार ७ डिसेंबरपासून त्याच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती परिवहन विभागाकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. ही प्रक्रिया महाआॅनलाइन या संस्थेमार्फत आॅनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारून व लॉटरी पद्धतीने उमेदवारांची निवड करून राबविण्यात येईल. याबाबत आॅनलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असेही यातून सांगण्यात आले. परवाना वाटपात आॅटोरिक्षा परवाना प्राप्त करण्यासाठी कोणतीही शैक्षणिक अर्हता विहित करण्यात आलेली नाही. शासन निर्धारित करेल असे परवाना शुल्क उमेदवारास प्रदान करावे लागेल. १५ डिसेंबरपर्यंत वाढीव मुदतीत ज्यांनी परवाना नूतनीकरण करून घेतलेले नाही तसेच यापूर्वी ज्यांनी रिक्षा परवाना धारण केला आहे अशा परवानाधारकांना प्रस्तावित लॉटरी प्रक्रियेत भाग घेता येणार नसल्याचे प्रसिद्धिपत्रकातून स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)