मुंबई : मुंबईत निवासी आणि औद्योगिक क्षेत्रासाठी अनुक्रमे २०, ५० टक्के लागू झालेल्या पाणीकपातीनंतर स्थायी समितीच्या सदस्यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत प्रशासनाला धारेवर धरले. त्यातच सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी मुंबईत एक दिवसाआड पाणी सोडण्याची सूचना केली. आता भविष्यातील जल नियोजनाचा विचार करीत प्रशासनाने थेट पाण्याची श्वेतपत्रिका काढावी, असे म्हणत सदस्यांनी सभेत प्रचंड गदारोळ केला. दरम्यान, येत्या १५ सप्टेंबर रोजी पाणीप्रश्नावर महापालिकेने विशेष बैठक बोलावली आहे.काँगेसचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी सर्वप्रथम मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलाव क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ४९ लाख दशलक्ष लीटर्स पाणीसाठा कमी असल्याचे निदर्शनास आणून दिले. प्रशासनाने पाण्याचा सविस्तर अहवाल सादर करावा आणि पाण्याची श्वेतपत्रिका काढावी, असे ते म्हणाले. मनसेच्या नगरसेविका अनिषा माजगावकर यांनी उपनगरांत थेट ५० टक्के पाणीकपात केली जात असल्याकडे लक्ष वेधले. पाण्याची गळती शोधणारे पथक स्थापन करण्यात यावे आणि पाण्याबाबत नागरिकांना आवश्यक माहिती उपलब्ध करून देईल, अशी हेल्पलाइन सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका अनुराधा पेडणेकर यांनी केली.
पाण्याची श्वेतपत्रिका काढा
By admin | Updated: September 10, 2015 03:36 IST