Join us

प्लास्टिक चपला विक्रीवरील बंदी हटवा

By admin | Updated: July 4, 2015 00:57 IST

परवानाधारक गटई कामगारांना प्लास्टिकची चप्पल विकण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी चर्मोद्योग परवानाधारक हक्क समितीच्या वतीने मुंबई महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

मुंबई : परवानाधारक गटई कामगारांना प्लास्टिकची चप्पल विकण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी चर्मोद्योग परवानाधारक हक्क समितीच्या वतीने मुंबई महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे.गेल्या पाच वर्षांपासून समिती या विषयाचा पाठपुरावा करत असून, समितीच्या म्हणण्यानुसार, परवानाधारक गटई कामगार तब्बल ६० वर्षांहून अधिक जुने आहेत. १९७७ साली वितरित करण्यात आलेल्या परवान्यांवर संबंधितांना प्लास्टिकची चप्पल विकण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र २०१० साली जेव्हा संगणकाद्वारे परवाने देण्यात आले तेव्हा त्यावर प्लास्टिक चप्पल विकण्याबाबत काहीच उल्लेख करण्यात आला नाही. परिणामी सद्य:स्थितीमध्ये महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या कारवाईमध्ये गटई कामगारांचे आर्थिक नुकसान होते आहे.गटई पिच परवानाधारक आणि गटई स्टॉल परवानाधारकांना प्लास्टिकची चप्पल डिस्प्ले करण्यासह विक्रीची परवानागी देण्यात यावी. सर्व परवानाधारकांचे परवाना शुल्क समान करण्यात यावे. परवानाधारकांच्या परवान्यामधील स्टॉलची लांबी, रुंदी आणि उंची समान असावी, अशा मागण्या समितीने केल्या असून, यासंदर्भातील निवेदन महापालिका उपायुक्त आनंद वागराळकर यांना सादर करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)