Join us

जुन्या इमारतींचा पुरातन टॅग काढा

By admin | Updated: April 1, 2015 00:47 IST

दादर येथील हिंदू व पारशी कॉलनी तसेच बीडीडी चाळ, परळ-लालबागमधील जुन्या चाळींवरील पुरातन वास्तूचा टॅग काढण्याची शिफारस राज्य सरकारमार्फत

शेफाली परब-पंडित, मुंबईदादर येथील हिंदू व पारशी कॉलनी तसेच बीडीडी चाळ, परळ-लालबागमधील जुन्या चाळींवरील पुरातन वास्तूचा टॅग काढण्याची शिफारस राज्य सरकारमार्फत नियुक्त पुरातन वास्तू आढावा समितीने केली आहे़ त्यामुळे पुरातन वास्तूची श्रेणी मिळाल्यामुळे पुनर्विकासापासून वंचित येथील इमारतींना आता सुटकेचा नि:श्वास सोडता येणार आहे़ मात्र यामध्ये काही पुरातन वास्तूंना अपवाद ठेवण्यात आले आहे़ दादर, परळ, लालबाग, सायन येथील जुन्या इमारती व चाळींना पुरातन वास्तू व परिसराचा दर्जा मिळाल्यामुळे त्यांच्या पुनर्विकासाचा मार्गच खुंटला होता़ त्यामुळे अनेक ठिकाणी धोकादायक स्थितीत असलेल्या या इमारतींमधील रहिवासी हवालदिल झाले होते़ याचा रोष सर्वप्रथम शिवाजी पार्क येथून बाहेर पडत सर्वत्र पोहोचला़ त्यामुळे राज्य सरकारने राज्याचे माजी सचिव दिनेश अफझलपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा समिती स्थापन केली होती़रहिवाशांच्या तक्रारीवर गेले अनेक महिने सुनावणी घेतल्यानंतर अफझलपूरकर समितीने आपला अहवाल आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे सादर केला असल्याचे सूत्रांकडून समजते़ यामध्ये खोदादाद सर्कल म्हणजेच दादर टी़टी़मध्ये काही मोठे बदल सुचविलेले नाहीत. परंतु परळ-लालबाग येथील अनेक जुन्या चाळी व इमारतींना पुरातन वास्तूच्या यादीतून मुक्त करण्याची शिफारस आढावा समितीने केली आहे़ त्यामुळे गेले काही महिने लढा देणाऱ्या येथील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे़