वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेने आपल्या हद्दीतील व हद्दीच्या बाहेर असलेल्या परिसराला आपत्तीविरहीत करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत घेतला. आपत्ती व्यवस्थापन योजनेअंतर्गत मच्छीमार बांधव व मासेमारी बोटींना लाईफ जॅकेट, प्रथमोपचार किट, जीवनरक्षक रींग व वायरलेस यंत्रणा पुरविण्याकरीता ७५ लाख रू. च्या खर्चास मंजुरी देण्यात आली.वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीला लागून असलेल्या किनारपट्टीवरील गावात मोठ्या प्रमाणात मासेमारी व्यवसाय केला जातो. या परिसरात ११ नोंदणीकृत मच्छीमार संस्था असून खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटींची संख्या २५ इतकी आहे. या सर्व गावांत सुमारे २७५ मासेमारी बोटी आहेत. या गावातील मच्छीमार संस्थांचे सर्वेक्षण केले असता मच्छीमारांजवळ वरील साहित्यांचा तुटवडा असल्याचे दिसून आले. त्यामुळे महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्णयानुसार महानगरपालिकेने वरील निर्णय घेतला. हद्दीबाहेर असलेल्या इतर गावांनाही अधिक सहाय्य देण्यासंदर्भात प्रशासन राज्यशासनाच्या अनुमतीची प्रतीक्षा करीत आहे. (प्रतिनिधी)
महापालिकेबाहेरील मच्छीमारांना दिलासा
By admin | Updated: July 5, 2014 03:45 IST