Join us  

परीक्षेला बसूनही अनुपस्थित असल्याचा शेरा!, मुंबई विद्यापीठाचा अजब कारभार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 5:37 AM

परीक्षेला बसूनही अनुपस्थितीचा शेरा देत, ९ विद्यार्थ्यांना नापास केल्याचा प्रकार मुंबई विद्यापीठात उघडकीस आला आहे. गिरगाव येथील भवन्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आहे.

मुंबई : परीक्षेला बसूनही अनुपस्थितीचा शेरा देत, ९ विद्यार्थ्यांना नापास केल्याचा प्रकार मुंबई विद्यापीठात उघडकीस आला आहे. गिरगाव येथील भवन्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आहे.गिरगावच्या भवन्स महाविद्यालयातून विज्ञान शाखेच्या तृतीय वर्षाची (पाचवे सत्र) परीक्षा देणाऱ्या नऊ विद्यार्थ्यांसोबत हा प्रकार घडला आहे. हे विद्यार्थी पाचव्या सत्रात नापास झाल्याने त्यांनी एटीकेटी दिली होती. या वेळी ते पुन्हा अनुत्तीर्ण झाले. त्यामुळे त्यांनी दुसºयांदा एटीकेटी दिली. मात्र, ते अनुपस्थित असल्याचे कारण दाखवत निकालात अनुत्तीर्ण असा शेरा देण्यात आला. आपण परीक्षेला बसलो असून, परीक्षेचे हजेरी पत्रक आणि हॉल तिकिटांवर पर्यवेक्षकाची सही असतानादेखील अनुत्तीर्ण कसे दाखविण्यात आल्याचा सवाल संबंधित विद्यार्थ्यांनी केला आहे. हे विद्यार्थी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात हेलपाटे घालून न्याय मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.या विद्यार्थ्यांनी भवन्स महाविद्यालयाच्या विभाग प्रमुखांकडेही मदत मागितली. मात्र, ही समस्या व त्यासाठी आवश्यक प्रक्रिया त्यांना विद्यापीठासोबतच पूर्ण करावी, असे सांगण्यात आले. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला या संदर्भात पत्र लिहिले असून, न्यायाची मागणी केली आहे. याबाबत आपण दोन दिवसांत उत्तर कळवू, असे विद्यापीठ प्रशासनाकडून त्यांना सांगण्यात आल्याची माहिती या विद्यार्थ्यांनी दिली.या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण शेरा का देण्यात आला? याची चौकशी केली जाईल. हा प्रकार बबलिंगमुळे घडला असू शकतो. परीक्षेत बबलिंगमुळे विद्यार्थ्यांचा बैठक क्रमांक चुकतो. संबंधित विद्यार्थ्यांनी दिलेल्या तक्रारींवर चौकशी करून त्यांचा निकाल लवकर जाहीर केला जाईल.- विनोद माळाळे, उपकुलसचिव (जनसंपर्क ), मुंबई विद्यापीठ

टॅग्स :मुंबई विद्यापीठ