Join us

डॉक्टरांच्या संपकाळातही रुग्णांना दिलासा

By admin | Updated: July 5, 2014 03:35 IST

रायगड जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय अधिकारी १ जुलै पासून बेमुदत कामबंद असहकार आंदोलनात सहभागी झाले आहेत.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय अधिकारी १ जुलै पासून बेमुदत कामबंद असहकार आंदोलनात सहभागी झाले आहेत. ग्रामीण रु ग्णांना तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार नोंदणीकृत स्थानिक खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी पध्दतीवर नेमलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत रुग्णांना सेवा देण्याबाबतचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली आहे. नोंदणीकृत स्थानिक खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी पध्दतीवर नेमलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सेवाभावी वृत्तीने प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा परिषदेच्या दवाखान्यात उपस्थित राहून सेवा देण्यासाठी दैनंदिन कामकाज पाहण्याचे आदेश रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत. या वैद्यकीय सेवा देताना संबंधित आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद दवाखान्यात उपस्थित राहून उपलब्ध सर्व पायाभूत सुविधा, औषधे, उपकरणे व कर्मचारी यांचा वापर रुग्णसेवेसाठी त्यांना करता येईल. या कालावधीत आंतरवासिता वैद्यकीय प्रशिक्षणार्थी यांनी त्यांच्या नियुक्तीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद दवाखान्यात उपस्थित राहून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यास सहकार्य करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. संप कालावधीपुरतीच रुग्णांच्या सोयीसाठी ही पर्याय व्यवस्था सुरु राहणार आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र, जिल्हा परिषदेचे दवाखाने संप कालावधीत सुरळीतपणे चालू राहतील यासाठी लक्ष द्यावे, अशा सूचना दिल्या आहेत. संप कालावधीत रुग्णांची गैरसोय दूर होवून बाह्य रु ग्ण सेवा, आंतररु ग्ण सेवा व आपत्कालीन रुग्ण सेवा चालू राहाव्यात म्हणून, ही पर्यायी व्यवस्था केली आहे, अशी माहिती मिसाळ यांनी दिली आहे. (विशेष प्रतिनिधी)