Join us  

लैंगिक हिंसाचार समस्यांवर महिलांना 'दिलासा'; महापालिकेच्या सर्व प्रसूतिगृहात आता मिळणार सुविधा

By संतोष आंधळे | Published: March 09, 2024 7:16 PM

महानगरपालिका रुग्णालयांमध्ये असलेल्या 'दिलासा’ केंद्रांचा आता महानगरपालिकेच्या सर्व प्रसूतिगृहांमध्ये 'दिशा’ केंद्रांच्या स्वरुपात विस्तार करण्यात येणार आहे.

मुंबई : लैंगिक हिंसाचाराला सामोरे जावे  लागणाऱ्या महिलांना त्यांच्या घराजवळ वैद्यकीय त्याचप्रमाणे कायदेशीर सेवा पुरवता यावी, या दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर नवीन उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे महानगरपालिका रुग्णालयांमध्ये असलेल्या 'दिलासा’ केंद्रांचा आता महानगरपालिकेच्या सर्व प्रसूतिगृहांमध्ये 'दिशा’ केंद्रांच्या स्वरुपात विस्तार करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर लैंगिक व घरगुती हिंसाचाराविषयी आरोग्य आपल्या दारी योजनेतूनही जनजागृती करण्यात येणार आहे.

महिलांना लैंगिक हिंसाचार (जेंडर बेस्ड व्हायलन्स) घटनांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांमध्ये महिलांना तत्परतेने प्रतिसाद देण्यासह आवश्यक त्या मदतीचा विस्तार करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी निर्देश दिले होते.

महानगरपालिकेच्या १२ रुग्णालयांमध्ये सध्या कार्यरत असलेल्या 'दिलासा’ केंद्रांचा विस्तार केला जाणार आहे. कौटुंबिक हिंसाचार हा महिलांवरील हिंसाचाराचा अत्यंत व्यापक प्रकार आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएफएचएस)-५ मधील माहितीनुसार, नागरी भागांमध्ये २४ टक्के महिलांना जोडीदाराकडून हिंसाचार तसेच १८ ते ४९ वयोगटातील २.५ टक्के गर्भवती महिलांना शारीरिक हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे. हिंसाचाराच्या अशा घटनांचा एकूण विचार करता ७७ टक्क्यांपेक्षा जास्त महिलांनी अशा घटना अथवा अनुभवांबद्दल थेट तक्रार करणे किंवा बोलणे टाळले आहे.

कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिलांच्या सहकार्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अनेक उपाय केले जात आहेत. लैंगिक हिंसाचाराने (जेंडर बेस्ड व्हायलन्स) पीडित महिलांसाठी महानगरपालिका रुग्णालयांमध्ये संकटकालीन हस्तक्षेप केंद्र (क्रायसिस इंटरव्हेन्शन सेंटर) स्वरूपातील १२ दिलासा केंद्रे आणि दोन वन स्टॉप केंद्रे कार्यरत आहेत. लैंगिक हिंसाचाराने पीडित संशयित महिलांना विविध ओपीडी मधून पाठवले जाते.

१५ हजारापेक्षा अधिक महिलांना मदत

गेल्या वर्षी  २०२३ मध्ये, दिलासा केंद्रांमध्ये लैंगिक हिंसाचाराने पीडित १५ हजार ४०६ महिला आणि १ हजार २५१ मुलांची वार्षिक तपासणी आणि समुपदेशन करण्यात आले. तपासणी केल्यानंतर १ हजार ७०७ महिला तर ५३० बालकांची या केंद्रांवर लैंगिक हिंसाचार पीडित म्हणून नोंदणी करण्यात आली. या सर्वांना समुपदेशनासोबतच आवश्यकतेनुसार वैद्यकीय मदत तसेच कायदेशीर आणि पोलीस मदत पुरविण्यात आली.

महानगरपालिकेच्या प्रसूतिगृह केंद्रांमध्ये लैंगिक हिंसाचाराची प्राथमिक तपासणी आणि अन्य सेवा पुरविण्यासाठी ‘दिशा’ केंद्र सुरू केले जातील. सर्व केंद्रांमध्ये तपासणी, समुपदेशन आणि संदर्भ सेवा प्रदान करण्यासाठी परिचारिकांची क्षमता वृद्धी करण्यात येईल. त्याचप्रमाणे, ‘आरोग्य आपल्या दारी’ योजनेअंतर्गत तळागाळात काम करणारे आरोग्य कर्मचारी (आशा किंवा सामुदायिक आरोग्य स्वयंसेवक) लैंगिक किंवा घरगुती हिंसाचार आणि त्यावर उपलब्ध असलेल्या सेवांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करतील.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकालैंगिक शोषण