ठाणे : रिलायन्स फोरजी ला अखेर रस्ते खोदाईनुसारच दर आकारण्याचा निर्णय आता ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार आता दुसऱ्या टप्यातील अतिरिक्त २५ कोटी ७७ लाख ५९ हजार २०२ रुपये अदा करण्याचा आदेश पालिकेने संबधींतांना दिला आहे. तसेच ही रक्कम न भरल्यास पुढील कामाला मंजुरी दिली जाणार नसल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे. पालिकेने घेतलेल्या या भूमिकेमुळे आता गोंधळात रिलायन्स फोरजीचा ठराव मंजुर करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनाही चपराक लागली आहे. गेल्या चार ते पाच महिन्यापासून ठाणे महापालिकेत रिलायन्स फोर जी प्रकरण चांगलेच गाजत आहे. स्थायी समितीसह, महासभेतही या विषयावरुन रणकंदन माजले होते. इतर संस्थांसाठी देण्यात आलेले दर वेगळे आणि रिलायन्ससाठी रेडकारपेट असाच काहीसा प्रकार सत्ताधारी शिवसेनेसह पालिकेने केल्याचे मत लोकशाही आघाडीने व्यक्त केले होते. यापूर्वी रस्ते खोदाईसाठी परवानगी देताना १ मीटर खोल खडडा गृहीत धरुन पैसे आकारले जात होते. मात्र रिलायन्ससाठी विशेष नियमाअंतर्गत ०.५ मीटर खोदाईसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात येऊन या संदर्भातील प्रस्ताव २९ डिसेंबर २०१४ रोजी झालेल्या महासभेत गोंधळात मंजूर करण्यात आला होता. रस्ता खोदण्याचे दर १५०० रुपये या प्रमाणे असतांना पालिकेने रिलायन्सला हाच दर ७२ रुपये लावला होता. परंतु यामुळे पालिकेचे कोट्यावधींचे नुकसान होणार असल्याचा आरोप काही सत्ताधारी नगरसेवकांसह लोकशाही आघाडीनेही केला होता.
रिलायन्सला २५ कोटी भरण्याचा आदेश
By admin | Updated: February 24, 2015 22:27 IST