कासा : पावसाअभावी भातरोपे करपली आहेत. शेतकऱ्यांच्या रोपण्या थांबल्या आहेत. त्यामुळे भातशेती हंगाम वाया जाणार असल्याने उरलेली रोपे वाचविण्यासाठी कासा भागातील शेतीला सुर्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी कुणबी सेनेकडून करण्यात येत आहे.गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे उतार जमिनीवरील व कोरड्या जमिनीवरील भातपिके होरपळून निघाली आहेत.मोठ्या प्रमाणात राब व शेत करपली आहेत. काही शेतकऱ्यांनी पिके वाचविण्यासाठी व रोपणीसाठी इंजिन व मोटारद्वारे पाणी पुरवठा केला आहे. परंतु सर्वच शेतकऱ्यांना हे शक्य नाही. तसेच रोपणी केलेली पिकेही पाण्याअभावी शेतातच करपली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची पीके वाया जाणार असल्याने पालघर, डहाणू तालुक्यातील सुर्या कालव्याअंतर्गत येणाऱ्या गावांना सुर्या कालव्यातून पाणीपुरवठा करून पीके वाचविता येतील व सदर ठिकाण्याच्या शेतकऱ्यांना शेती करता येईल. त्यामुळे सहा गावांना सुर्या कालव्यातून पाणीपुरवठा करण्याची मागणी शेतकरी व कुणबी सेनेकडून करण्यात आली आहे. पावसाने ओढ दिल्याने आता हाच मार्ग उरला आहे.सुर्याचा उद्देश सिंचनचपालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर व विक्रमगड तालुक्यात कालव्याअंतर्गत उन्हाळ्यात कासा जवळील सुर्या धरणातून शेतीला पाणीपुरवठा केला जातो. सुमारे शंभर गावांना या धरणातून उन्हाळ्यात शेतीसाठी पाणीपुरवठा होतो व सदर कालव्याच्या पाण्यातून शेतकरी भातशेती व भाजीपाला भुईमूग पिके घेतात व सदर कालव्यातून दिल्या जाणाऱ्या पाण्याची पाणीपट्टीही शेतकरी देत असतात. सिंचन या मुख्य उद्देशाने सुर्या धरण बांधण्यात आले. सदर धरणातील पाण्याअंतर्गत १४ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आणली आहे.
सुर्या कालव्यातून पाणी सोडा
By admin | Updated: July 14, 2015 23:01 IST