Join us  

दिलासादायक! कर्करोगावरील ३९० औषधांच्या किमती घटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 6:22 AM

सुधारित दर लवकरच होणार लागू; ८७ टक्क्यांनी किंमत कमी करण्याचा निर्णय

मुंबई : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार औषध कंपन्यांनी कर्करोगावरील औषधांच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्करोगावरील ३९० औषधांच्या किमती ८७ टक्क्यांनी कमी होणार आहेत. हे सुधारित दर लवकरच लागू करण्यात येणार असल्याने, यामुळे कर्करोगग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.केंद्र सरकारकडून ४२ कर्करोग विरोधी औषधांच्या किमती नियंत्रणात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, गेल्या आठवड्यात या औषधांवरील बाजार मूल्य ३० टक्क्यांवर नियंत्रित करण्यात आले. त्यानंतर, औषध उत्पादकांना औषधांचे प्रथम विक्री दर निश्चित करण्याचे निर्देश देत, सुधारित किमती मागविल्या होत्या. औषध कंपन्यांनी सरकारच्या या निर्देशानुसार कर्करोगावरील औषधांच्या किमतीची सुधारित यादी राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाकडे दिली असून, ही यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. या यादीत ३९० औषधांचा समावेश आहे. कर्करोगावरील औषधांच्या किमतीत कपात झाल्याने जवळपास ८०० कोटी रुपयांच्या सरकारी निधीची वार्षिक बचत होणार आहे.२२ लाख रुग्णांना होणार लाभ२०१८ या वर्षात ८ लाख जणांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला आहे. २०४० पर्यंत कर्करोगग्रस्तांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढणाऱ्या कर्करोगावरील उपचार मात्र खर्चीक आहेत. कर्करोगग्रस्तांना उपचारांवर लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता देशातल्या सुमारे २२ लाख कर्करुग्णांना लाभ होणार आहे.३० टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावता येणार नाहीविविध ७२ प्रकारच्या फॉर्म्युलेशनची ३५५ ब्रँडच्या ४२ प्रकारांत ही औषधे उपलब्ध होती. औषधी कंपन्या आणि राज्यांचे औषध नियंत्रक, स्टॉकिस्ट आणि किरकोळ विक्रेत्यांना सात दिवसांच्या आत किमती कमी करण्यास सांगण्यात आले आहे. औषधी कंपन्या, त्याचे विपणन करणाऱ्या कंपन्यांना या औषधांवर ३० टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावता येणार नाही. याशिवाय एका वर्षात या औषधांची किमान किरकोळ किंमत (एमआरपी) १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढविता येणार नाही.ट्रेड मार्जिनमुळे घटले औषधांचे दरट्रेड मार्जिन घटविल्याने कर्करोगाची अनेक औषधे स्वस्त होणार आहेत. सरकारी वैद्यकीय संहितेच्या नियमित औषधे यादीत समाविष्ट नसलेल्या औषधांवर कंपन्या इच्छेनुसार ट्रेड मार्जिन लागू करू शकतील. मात्र, या यादीतील औषधांवर ८ ते १६ टक्के एवढेच ट्रेड मार्जिन लावणे अनिवार्य असणार आहे.कर्करोग आणि इतर दुर्मीळ आजारांवरील उपचार खर्चीक असतात. तसेच औषधेही महाग असल्यास लोकांना आजारावर उपचार करणे अवघड होऊ शकते. सरकारच्या नव्या निर्णयानुसार कर्करोगांवरील औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :कर्करोगऔषधं