Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोर्न शूटला नकार दिला म्हणून दिले गुंगी येणारे पेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:05 IST

पोर्न रॅकेटमध्ये अडकलेल्या तरुणीची व्यथालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शुटिंग सेटवर गेल्यानंतर पोर्न शूटबाबत समजताच तरुणीने नकार दिला. ...

पोर्न रॅकेटमध्ये अडकलेल्या तरुणीची व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शुटिंग सेटवर गेल्यानंतर पोर्न शूटबाबत समजताच तरुणीने नकार दिला. मात्र, करार मोडल्यास १० लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगून तिला गुंगी येणारे पेय देत पोर्न शूट करण्यात आले, असा आरोप अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या पोर्न फिल्म प्रोडक्शन रॅकेटमध्ये फसलेल्या तरुणीने केला आहे.

तक्रारदार तरुणी मूळची झारखंडची रहिवासी असून, तीन वर्षांपूर्वी तिने ‘मॉडेलिंग’ सुरू केले. स्थानिक सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर तिने चित्रपट, जाहिरात, वेब मालिकांमध्ये अभिनयाची संधी मिळावी, यासाठी मुंबईत येऊन धडपड सुरू केली. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात अभिनेत्री आणि या प्रकरणातील प्रमुख आरोपी गहना वशिष्ठसोबत एका वेब मालिकेत तिला अभिनयाची संधी देण्यात आली. त्यानंतर डिसेंबर महिन्यात अन्य एका वेब मालिकेसाठी निवड झाल्याचे तिला सांगण्यात आले. याबाबत यास्मीन खान उर्फ अलीशा नावाच्या महिलेने तिच्याशी संपर्क साधला. तिच्याकडून कंत्राट करून घेतले आणि मढ येथील ग्रीन पार्क बंगल्यात नेण्यात आले. तेथे तिला नग्न होऊन अश्लील अभिनय करण्यास सांगण्यात आले. त्याला नकार देताच यास्मीनने तिला धमकावले. करार मोडल्यास १० लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. तेथे उपस्थित अन्य व्यक्तींनीही या तरुणीला घाबरवले. यास्मीनने ‘एनर्जी ड्रींक’ असल्याचे भासवून तिला एक पेय दिले. ते पिताच तरुणीची शुद्ध हरपली. त्यानंतर तिच्याकडून चित्रिकरण करून घेण्यात आले. तसेच मोबदला म्हणून ३० हजार रुपये तरुणीला देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या तरुणीला हा चित्रपट हॉटहिट मुव्हीज अ‍ॅपवरच प्रदर्शित होईल. अन्य कोणत्याही समाजमाध्यमांवरून चित्रपट किंवा त्याचे भाग व्हायरल होणार नाहीत, असे आश्वासन दिले होते. मात्र, जानेवारी महिन्यात तरुणीने अभिनय केलेला अश्लील चित्रपट समाजमाध्यमांवरून व्हायरल झाल्याने तरुणीने पोलिसांत धाव घेतली होती. याप्रकरणी फेब्रुवारीमध्ये मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.