Join us
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयातील साफसफाई ठेकेदारास पुन्हा मुदतवाढ

By admin | Updated: January 25, 2015 23:45 IST

महापालिकेच्या रुग्णालयामधील साफसफाई ठेकेदाराच्या कामाची मुदत संपली आहे. परंतु वेळेत नवीन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली नसल्यामुळे ठेकेदारास वारंवार मुदतवाढ द्यावी लागत आहे.

नवी मुंबई : महापालिकेच्या रुग्णालयामधील साफसफाई ठेकेदाराच्या कामाची मुदत संपली आहे. परंतु वेळेत नवीन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली नसल्यामुळे ठेकेदारास वारंवार मुदतवाढ द्यावी लागत आहे. पालिकेचे वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर, माता बाल रुग्णालयांमधील साफसफाईचा ठेका महापालिकेने जुलै २०११ मध्ये बी. व्ही. जी. इंडिया लिमिटेड या कंपनीला दिला आहे. ठेक्याची मुदत जून २०१४ पर्यंत होती. वास्तविक ठेक्याची मुदत संपण्यापूर्वीच प्रशासनाने नवीन ठेकेदार नियुक्त करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करणे आवश्यक होते. परंतु याविषयी झालेल्या दफ्तर दिरंगाईमुळे ठेकेदारास मुदतवाढ देण्याची वेळ आली. सर्वप्रथम जुलै ते आॅक्टोबर २०१४ च्या दरम्यान ठेकेदारास मुदतवाढ देण्यात आली. परंतु या दरम्यानच्या कालावधीमध्येही ठेकेदार नियुक्ती करण्यास अपयश आले असून ठेकेदारास पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये यापूर्वी वाढीव मुदतीसाठीचा प्रस्ताव चर्चेला आला तेव्हा सर्वच नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले होते. उशीर का झाला याचा खुलासा करण्याची मागणी केली. यानंतर आयुक्तांनीही तत्कालीन मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांकडे याविषयी लेखी खुलासा मागविला होता. संबंधित अधिकाऱ्यांनी अत्यंत खळबळजनक कबुली दिल्याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात सुरू झाली होती. कोणामुळे उशीर झाला. कोणत्या नेत्यांची मीटिंग होवून काय चर्चा झाली होती. कोणाच्या स्वीय सहायकांनी वेळ दिला नाही याविषयी माहिती दिल्याचे सांगण्यात आले होते. परंतु ही अफवा होती की सत्य हे समोर आलेच नाही. ठेकेदाराला वारंवार वाढीव मुदत दिली जात असल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून आता तरी नवीन ठेकेदार नियुक्त करण्याचे काम वेळेवर करावे अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)