Join us

प्रकल्पग्रस्तांचे तेथेच पुनर्वसन

By admin | Updated: March 4, 2015 01:13 IST

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ कॉरिडॉरमुळे बाधित होणाऱ्या काळबादेवीतील १८ इमारती आणि गिरगावातील ८ अशा २६ इमारतींमधील प्रकल्पबाधित ७३७ कुटुंबांचे पुनर्वसन आहे

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ कॉरिडॉरमुळे बाधित होणाऱ्या काळबादेवीतील १८ इमारती आणि गिरगावातील ८ अशा २६ इमारतींमधील प्रकल्पबाधित ७३७ कुटुंबांचे पुनर्वसन आहे त्याच जागेवर करण्यात येईल, अशी ग्वाही मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) दिली आहे.मेट्रो-३ मुळे बाधित होणाऱ्या काळबादेवी आणि गिरगाव परिसरातील रहिवाशांची मते जाणून घेण्यासाठी एमएमआरसीने मंगळवारी सार्वजनिक चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात काळबादेवी आणि गिरगाव परिसरातील २५२ रहिवाशांनी सहभाग घेतला. या वेळी रहिवाशांनी आपली भूमिका मांडली. या परिसरात आमची तिसरी-चौथी पिढी असल्यामुळे आम्हाला याच ठिकाणी राहायचे आहे. याच परिसरात आमचे पुनर्वसन झाले तरच आम्ही मेट्रो-३ प्रकल्पाला पाठिंबा देऊ अशी भूमिका रहिवाशांनी मांडली. तसेच पुनर्वसनाच्या योजना रहिवाशांना दाखविल्यानंतरच प्रकल्पाला पाठिंबा देण्याचे आश्वासन रहिवाशांनी या वेळी दिले. त्याचप्रमाणे रहिवाशांच्या उर्वरित मागण्या लवकरच सादर करू, असेही रहिवाशांनी सांगितले.तर गिरगावमधील विठ्ठलदास बिल्डिंग, व्हीआयपी लगेज शॉप, श्रीराम भवन, स्वामी निवास, पदपथावरील दुकाने, अन्नपूर्णा बिल्डिंग, खांती नगर, एकता नगर, धूतपापेश्वर या गिरगावातील इमारती बाधित होणार आहेत.मेट्रो-३ च्या जागेची गरज भागल्यानंतर त्याच ठिकाणी इमारतींची पुनर्बांधणी होऊ शकते काय? या शक्यतेची पडताळणी एमएमआरसीचे पथक करणार आहे. यानंतर शक्य असल्यास त्याच जागेवर बाधित कुटुंबांचे पुनर्वसन करण्याबाबतचा कच्चा आराखडा तयार करण्यात येईल, असे आश्वासन या वेळी एमएमआरसीच्या पथकाने या वेळी दिले. रहिवाशांशी चर्चा करून त्यांच्या संमतीनंतरच आराखड्याला अंतिम स्वरूप सरकारला सादर करण्यात येईल, असेही पथकाने सांगितले.मेट्रो-३ कॉरिडॉरची उभारणी करताना स्थानिक रहिवाशांचे आहे त्याच जागेवर कायमस्वरूपी पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत रहिवाशांना त्यांच्या हक्काच्या घरामधून बाहेर काढले जाणार नाही किंवा त्यांचे घर रिकामे केले जाणार नाही, असे एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)च्मेट्रो-३ प्रकल्पामुळे काळबादेवी आणि गिरगावमधील फक्त २६ इमारतींमधील ७३७ कुटुंबे बाधित होणार आहेत. काळबादेवी आणि गिरगाव स्थानकाच्या प्रवेश तथा निकास आणि अन्य काही सुविधांसाठी एमएमआरसीला मोकळी जागा आवश्यक आहे. च्या प्रकल्पामुळे काळबादेवी येथील नर्मदाबाई ट्रस्ट, कोटकर बिल्डिंग १७ आणि १८, सबीना हाऊस, तोडीवाला बिल्डिंग, मुन्नालाल मेन्शन अ आणि ब, सोना चेंबर, मच्छी बाजार, वर्न व्हिला, छत्रीवाला बिल्डिंग, खान हाऊस बिल्डिंग क्र. ५९१, ५९३, ५९५, राजशीला, कपाडिया चेंबर, चिराबाजार क्र. ६0५ आणि ६0७ आणि सिंगापूर बिल्डिंग बाधित होणार आहेत.