डोंबिवली : तळमजल्याला तडे गेलेली बिल्वदल ही चार मजली इमारत अतिधोकादायक झाल्याचे स्ट्रक्चरल आॅडिटमधून समोर आल्याने रहिवाशांचा निवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, रहिवाशांचे पुनर्वसन केल्याशिवाय इमारतीच्या पुनर्बांधणीला परवानगी मिळणार नाही, अशी भूमिका आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी मंगळवारी घेतल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. नामदेव पाटीलवाडीमधील बिल्वदल इमारतीच्या तळमजल्याला तडे गेल्याची घटना शनिवारी निदर्शनास आली. येथील ४८ कुटुंबांना तत्काळ इमारतीबाहेर काढून इमारत रिकामी करून संबंधित रहिवाशांचे स्थलांतर तात्पुरते पालिकेच्या रात्र निवारा केंद्रात करण्यात आले आहे. दरम्यान स्ट्रक्चरल आॅडिटचा अहवाल ही इमारत अतिधोकादायक असल्याचा आल्याने आता राहायचे कुठे, या विवंचनेत रहिवासी पडले आहेत. इमारत अतिधोकादायक झाल्याने या इमारतीवर हातोडा घालून ती जमीनदोस्त करण्यात येणार आहे. यावर मंगळवारी स्थानिक नगरसेविका सारिका चव्हाण यांच्या पुढाकाराने रहिवाशांनी आयुक्त सोनवणे यांची केडीएमसीच्या मुख्यालयात भेट घेतली. यावेळी जोपर्यंत रहिवाशांचे पुनर्वसन केले जात नाही तोपर्यंत संबंधित मालकाला इमारतीची नव्याने पुनर्बांधणी करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे आश्वासन सोनवणे यांनी रहिवाशांना दिले. यावेळी महापौर कल्याणी पाटील आणि सभागृहनेते कैलास शिंदे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आधी पुनर्वसन करा, मगच पुनर्बांधणी
By admin | Updated: August 14, 2014 00:35 IST