Join us  

ज्येष्ठ महिला नागरिकाच्या घरी नियमित भेट द्या - उच्च न्यायालय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 5:38 AM

एका ८६ वर्षीय महिलेच्या हितासाठी तिच्या घरी नियमित भेट देण्याचे निर्देश, उच्च न्यायालयाने संबंधित पोलीस ठाण्यातील पोलिसांना दिले आहेत.

मुंबई - एका ८६ वर्षीय महिलेच्या हितासाठी तिच्या घरी नियमित भेट देण्याचे निर्देश, उच्च न्यायालयाने संबंधित पोलीस ठाण्यातील पोलिसांना दिले आहेत. संबंधित महिलेची धाकटी मुलगी तिच्याशी क्रूरपणे वागत असल्याने, थोरल्या मुलीने आपल्या आईच्या संरक्षणासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली.मेल्बा फिगुइरेडो ही सध्या यू. के. मध्ये राहात आहे. तिने उच्च न्यायालयात हॅबिस कार्पोस (हरवलेली व्यक्ती उपस्थित करण्यासाठी केलेली याचिका) दाखल केली आहे. या याचिकेनुसार, तिच्या आईचा ताबा सध्या तिच्या लहान बहिणीकडे आहे. तिचीलहान बहीण आईशी क्रूरपणे वागत आहे. त्यामुळे आईच्या जिवाला धोका आहे, तसेच काही दिवसांपूर्वीच लहान बहिणीने आईवर जबरदस्ती करून, तिच्या खात्यातील पैसे स्वत:च्या खात्यावर वळविले, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.मात्र, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुलींची आई सुस्थितीत आहे आणि तिची चांगल्याप्रकारे देखभाल करण्यात येत आहे. त्यावर याचिकाकर्तीच्या वकिलांनी न्यायालयाला ई-मेल्स दाखविले. हे ई-मेल मोठ्या बहिणीला लहान बहिणीने पाठविले आहेत. त्यानुसार, आईच्या जिवाला धोका आहे, हे स्पष्ट कळते.त्यावर न्यायालयाने सरकारी वकिलांना हे ई-मेल्स पडताळण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणावरील पुढील सुनावणी १० जानेवारी रोजी ठेवली आहे. मात्र, तोपर्यंत ज्येष्ठ महिलेची नियमित भेट घेण्याचे निर्देश पोलिसांना देत, या संदर्भात ८ जानेवारी रोजी अहवाल सादर करण्यासही सांगितले.

टॅग्स :मुंबई हायकोर्टमुंबई