Join us

भायखळा राणीबागेत नियमित सफाई, तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:11 IST

मुंबई : मुंबईत मृतावस्थेत आढळलेल्या कावळ्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचे उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले ...

मुंबई : मुंबईत मृतावस्थेत आढळलेल्या कावळ्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचे उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात ३८ प्रजातींचे चारशेहून अधिक पक्षी असल्याने चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे असा कोणताही धोका टाळण्यासाठी प्राणिसंग्रहालयात नियमित स्वच्छता, प्राणी-पक्ष्यांवर बारकाईने निरीक्षण केले जात आहे.

मुंबईत चेंबूर येथील टाटा कॉलनी परिसरात काही कावळे मृतावस्थेत सापडले होते. तर गिरगाव चौपाटी येथील बालोद्यानमध्येही गेल्या काही दिवसांत १२ कावळे मृतावस्थेत सापडले आहेत. त्यामुळे कच्ची अंडी आणि मांस खाऊ नये, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. दरम्यान, भायखळा येथील प्रसिद्ध राणीच्या बागेत विविध प्रजातींचे शेकडो पक्षी - प्राणी असल्याने पालिका यंत्रणा सतर्क झाली आहे.

यामुळे राणी बागेला धोका नाही...

राणीच्या बागेत दररोज ५ हजार पर्यटक येत असतात. तर शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या १० ते १५ हजार असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राणिसंग्रहालय मार्च २०२० पासून बंद आहे. मुंबईबाहेरील काही प्राणिसंग्रहालय खुली करण्यात आली, मात्र राणीबाग अद्याप बंद असल्याने धोका नाही. तसेच काही प्राणी संग्रहालयात मोठे तलाव असल्याने स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे तिथे बर्ड फ्ल्यूचा धोका संभवत असतो. मात्र राणीबागेत तसे नाही. काही प्राण्यांना कोंबडीचे मांस देणे तूर्तास बंद करण्यात आले आहे.

-------

केंद्रीय झू प्राधिकरणाने ४ जानेवारी रोजी केलेल्या सूचनेनुसार मुंबईच्या प्राणिसंग्रहालयात दररोज पक्ष्यांचे दोनवेळा निरीक्षण केले जात आहे. तसेच प्राणिसंग्रहालयात नियमित साफसफाई केली जाते.

- डॉ. संजय त्रिपाठी (संचालक, वीरमाता जिजबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय)