Join us  

'म्हाडा'च्या मुंबई मंडळ सदनिका सोडतीसाठी अर्ज नोंदणीला प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 6:19 PM

मुंबई /कोकण मंडळाच्या २७६ दुकानी गाळ्यांसाठीही नोंदणी सुरु

मुंबई: मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पातील २१७ सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी, अर्ज करणे या प्रक्रियेचा शुभारंभ मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांच्या हस्ते तसेच मुंबई व कोकण मंडळांतर्गत येणाऱ्या दुकानी गाळ्यांच्या ई लिलावासाठी अर्जदारांची नोंदणी, अर्ज करणे या प्रक्रियेचा शुभारंभ कोकण मंडळाचे सभापती बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आला. वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडा मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमाला मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी विजय लहाने, वित्त नियंत्रक विकास देसाई उपस्थित होते. मुंबई मंडळाची सदनिका सोडत दि. २१ एप्रिल, २०१९ रोजी सकाळी दहा वाजता वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात होणार आहे. सदनिका सोडतीबाबत माहितीपुस्तिका व अर्जाचा नमुना https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.  मुंबई व कोकण मंडळांतर्गतच्या दुकानी गाळ्यांचा लिलाव दि. ०८ एप्रिल, २०१९ रोजी सकाळी ११ वाजता https://eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केला जाणार असून माहितीपुस्तिका व अधिक माहिती देखील याच संकेतस्थळावर उपलब्ध आहे.   मुंबई मंडळाच्या सदनिका सोडतीकरीता अर्जदारांची नोंदणी व अर्ज सादर करण्यासाठी ०७ मार्च दुपारी २ पासून १३ एप्रिल रात्री ११.५९ पर्यंत मुदत असणार आहे. एनईएफटी /आरटीजीएस द्वारे अनामत रक्कम ०७ मार्च ते १३ एप्रिल या कालावधीत संबंधित बँकेच्या कामकाजाच्या दिवशी व वेळेमध्ये भरता येणार आहे. डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग द्वारे अनामत रक्कम ०७ मार्च ते १३ एप्रिल रात्री ११.५९ वाजेपर्यंत भरता येणार आहे. सदनिका सोडतीत अल्प उत्पन्न गटासाठी सहकार नगर, चेंबूर येथील १७० सदनिका तर मध्यम उत्पन्न गटासाठी सहकार नगर-चेंबूर, कोपरी-पवई येथील ४७ सदनिकांचा समावेश आहे. या सर्व सदनिकांना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त असून अधिकाधिक नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मधू चव्हाण यांनी केले.दुकानी गाळ्यांच्या ई लिलावासाठी आज दुपारी दोन वाजेपासून ३० मार्च सायंकाळी ५ वाजेपर्यंत ई लिलाव संकेतस्थळावर नोंदणी, अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम भरणे आदींबाबत कार्यवाही करता येणार आहे. ०२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपासून ई लिलाव (ऑनलाइन बोली) सुरु होणार असून ०५ एप्रिल दुपारी २ वाजेपर्यंत ई लिलावासाठी मुदत देण्यात आली असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. या ई लिलाव प्रक्रियेत मुंबई मंडळांतर्गत असलेल्या प्रतीक्षा नगर-शीव (सायन), न्यू हिंद मिल-माझगाव, विनोबा भावे नगर-कुर्ला, स्वदेशी मिल-कुर्ला, तुर्भे मंडाले-मानखुर्द, तुंगा पवई, गव्हाणपाडा-मुलुंड, मजासवाडी-जोगेश्वरी, शास्त्री नगर-गोरेगाव, सिद्धार्थ नगर-गोरेगाव, चारकोप, मालवणी- मालाड येथील २०१ गाळ्यांचा समावेश आहे. तर कोंकण मंडळांतर्गतच्या विरार बोळींज, वेंगुर्ला सिंधुदुर्ग येथील ७७ सदनिकांचा समावेश आहे. 

टॅग्स :म्हाडामुंबई