समीर कर्णुक , मुंबईदिवसेंदिवस पालिका शाळांमधील घटणारी विद्यार्थ्यांची संख्या पाहता महानगर पालिकेने विद्यार्थ्यांना अधिक-अधिक सुविधा देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र चेंबूरमधील कोकण नगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना अक्षरश: जीव मुठीत धरुन शाळेत जावे लागत आहे. एम पश्चिम विभागातील अनेक पालिका अधिकारी आणि परिसरातील स्थानिक नगरसेवकास याची कल्पना आहे. मात्र त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने स्वत: पैसे जमा करुन हा रस्ता तयार करण्याचा मानस येथील रहिवाशांनी केला आहे. ‘लोकमत’ने हे प्रकरण सातत्याने लावून धरले आहे. चेंबूरमधील आर. सी. मार्गावर असलेला कोकण नगर हा अत्यंत दाट लोकवस्ती असलेला परिसर आहे. या रहिवाशांना आर.सी. मार्गावरुन सिंधी सोसायटी आणि कोकण नगर याठिकाणी येण्यासाठी पालिकेने एक राखीव रस्ता ठेवला आहे. मात्र सध्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे-झुडुपे तसेच डेब्रिज टाकण्यात आले आहे. परिणामी या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी बाजूलाच असलेल्या साठे नगर येथील दोन नाल्यांमधूनच वाट काढली आहे. गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून पालिका हा रस्ता तयार करणार अशी आशा येथील नागरिकांना होती. मात्र आजपर्यंत पालिकेने येथील डेब्रिज आणि घाण देखील हटवलेली नाही. याबाबत अनेकदा रहिवाशांनी येथील स्थानिक नगरसेवक आणि पालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यांच्याकडून नेहमीच या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.दोन नाल्यांच्या मधून जाणारा हा रस्ता केवळ २ फुटांचा असल्याने एका वेळी एकच व्यक्ती या रस्त्यावरुन जाऊ शकतो. त्यातच सध्या या नाल्यावरील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. परिणामी पाऊस पडल्यानंतर या खड्ड्यांमध्ये पाणी जमा होत असल्याने या घाण पाण्यातून जातांना लहान मुलांना मोठी कसरत करावी लागते. परिसरात बालवाडी अथवा शाळा नसल्याने येथील विद्यार्थ्यांना बाजूच्या परिसरात जावे लागते. मात्र त्याठिकाणी जाण्यासाठी या चिंचोळ्या रस्त्याशिवाय मार्ग नसल्याने ही मुले जीव मुठीत धरुन हा नाला पार करतात. मात्र येत्या आठ दिवसांत पालिकेने हा रस्त्या तयार न केल्यास स्वत: पैसे जमा करुन या रस्त्याचे काम करु, अशी प्रतिक्रिया येथील स्थानिक रहिवाशांकडून देण्यात आली आहे.अनेक वर्षांपासून नाल्याच्या बाजूला असलेला रस्ता लवकरच तयार करुन देऊ, असे आश्वासन अनेकदा पालिका अधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र अद्यापही हा रस्ता तयार झालेला नाही. त्यातच नाल्यावरुन जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. सध्या या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून पावसाळयात पाणी जमा होत असल्याने नाल्याच्या कट्ट्यावरुन जाताना अनेकांचा पाय घसरुन नाल्यात पडतात. त्यामुळे या नाल्याच्या रस्त्यावर केवळ रेती सिमेंट टाकून तरी हा रस्ता चालण्यालायक करावा, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.तोडगा काढू‘उद्याच याबाबत माहिती घेऊन या समस्येवर लवकरच तोडगा काढण्याचा प्रयत्न करु.’- हर्षद काळे, सहाय्यक आयुक्त, एम पश्चिम विभाग
शाळेच्या दुर्गम वाटेकडे पालिका, नगरसेवकाचे दुर्लक्ष
By admin | Updated: July 17, 2015 02:28 IST