Join us
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारांपुढे पालिका नतमस्तक

By admin | Updated: February 23, 2016 02:45 IST

नालेसफाईच्या कामांमध्ये ठेकेदार हातचलाखी करत असल्याने नाल्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची अट पालिकेने आता शिथिल केली आहे़ चांगले ठेकेदार मिळत नसल्याने पालिकेने

मुंबई : नालेसफाईच्या कामांमध्ये ठेकेदार हातचलाखी करत असल्याने नाल्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची अट पालिकेने आता शिथिल केली आहे़ चांगले ठेकेदार मिळत नसल्याने पालिकेने काही अटी शिथिल केल्यानंतर आता प्रशासनाने ठेकेदारांपुढे पुन्हा गुडघे टेकले आहेत़ आता सीसीटीव्हीऐवजी नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामाचे व्हिडीओ शूटिंग होणार आहे़गेल्या वर्षी नालेसफाईच्या कामांमध्ये दीडशे कोटी रुपयांचा घोटाळा उजेडात आला होता़ याची गंभीर दखल घेऊन पालिका आयुक्तांनी २४ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरू केली़ मात्र जुने ठेकेदार निविदा प्रक्रियेतून बाद झाल्याने नालेसफाईसाठी ठेकेदार आणायचे कुठून? असा पेच पालिकेपुढे निर्माण झाला. आतापर्यंत दोन वेळा पालिकेने निविदा मागविल्या आहेत. त्यातील अटी आता शिथिल करण्यात आल्या असून, यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची अट काढून टाकण्यात आली आहे.घोटाळा उघड झाल्यानंतर आयुक्तांनी सीसीटीव्ही बसविण्याची अट घातली होती. परंतु ती अट त्यांनीच आता मागे घेतली आहे. ही अट निविदेमध्ये नमूद करण्यात आलेली नसल्याने सीसीटीव्ही बसविण्याची ठेकेदारांना सक्ती करणे उचित नसल्याचे निवेदनाद्वारे स्थायी समितीपुढे सांगण्यात आले़ सीसीटीव्ही खर्चीक पडत असल्याने व्हिडीओ शूटिंग करूनही नालेसफाईच्या कामातील पारदर्शकता जपता येईल, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी व्यक्त केला़ (प्रतिनिधी)यासाठी नको सीसीटीव्हीचा वॉचसीसीटीव्ही यंत्रणेसाठी ८६ कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे़ प्रत्येक नाल्यासाठी स्वतंत्र कॅमेरे बसवावे लागणार असून, काम संपल्यानंतर सीसीटीव्ही त्या जागेवरून हलवावे लागतील़ त्यामुळे अशा तात्पुरत्या स्वरूपाच्या व्यवस्थेवर एवढा मोठा खर्च करणे सयुक्तिक नसल्याचे मत प्रशासनाने व्यक्त केले आहे़ठेकेदारांनी सोडला नि:श्वाससीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचा खर्च ठेकेदारांनाच करावा लागणार होता़ त्यामुळे प्रशासनाच्या या नव्या निर्णयाने ठेकेदारांनी मात्र सुटकेचा नि:श्वास सोडला आहे़ मुंबईत मोठे व छोटे नाले तसेच नद्यांची एकूण लांबी ६५० कि़मी़ आहे़ यापैकी शहरात १०९ कि़मी़, पूर्व उपनगरांमध्ये २३० कि़मी़ आणि पश्चिम उपनगरांमध्ये ३११ कि़मी़ लांबीचे नाले आहेत.एकूण ८ लाख २ हजार ८३१ मेट्रिक टन गाळ सुमारे १५ महिन्यांत काढणे अपेक्षित आहे़