Join us
Daily Top 2Weekly Top 5

चिंतनच्या नार्को टेस्टला नकार

By admin | Updated: January 10, 2016 01:31 IST

शिल्पकार चिंतन उपाध्यायची नार्कोटेस्ट घेण्यासाठी कांदिवली पोलिसांनी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र चिंतन उपाध्यायने यासाठी नकार दिल्याने सत्र न्यायालयाने कांदिवली

मुंबई : शिल्पकार चिंतन उपाध्यायची नार्कोटेस्ट घेण्यासाठी कांदिवली पोलिसांनी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र चिंतन उपाध्यायने यासाठी नकार दिल्याने सत्र न्यायालयाने कांदिवली पोलिसांचा अर्ज फेटाळला.चित्रकार आणि शिल्पकार हेमा उपाध्याय व तिचा वकील हरेश भंबानीची हत्या केल्याचा आरोप चिंतनवर आहे. ‘चिंतन सत्य लपवत आहे. तपासासाठी पोलिसांना सहकार्य करत नाही. त्यामुळे त्याची नार्कोअ‍ॅनालिसस चाचणी घेण्याची परवानगी द्यावी,’ असा अर्ज कांदिवली पोलिसांनी सत्र न्यायालयापुढे केला. मात्र चिंतनच्या वकील शुभदा खोत यांनी चिंतनने या प्रक्रियेस परवानगी दिली नसल्याची माहिती न्यायाधीशांना दिली. त्यामुळे न्यायाधीशांनी पोलिसांचा नार्को टेस्टचा अर्ज फेटाळला. हेमाची मैत्रीण संचु मेनन हिने चिंतनच्या वकिलाविरुद्ध ‘पर्जुरी’चा अर्ज केला. चिंतनच्या वकील जयश्री भारद्वाज यांनी चिंतनवर थर्ड डिग्री वापरण्यात आल्याचे न्यायालयाला सांगितले. मात्र त्याच्या वैद्यकीय अहवालावरून त्याच्यावर ‘थर्ड डिग्री’चा वापर झाल्याचे दिसत नाही. तसेच त्याला न्यायाधीशांनी पोलिसांविषयी काही तक्रार आहे का? अशी विचारणाही केली होती. त्या वेळी त्याने नकारात्मक उत्तर दिले. त्यावर चिंतनच्या वकिलांनी हे वैद्यकीय चाचणीद्वारे सिद्ध होईल, असे म्हटले. तसेच या प्रकरणातील आणखी एक आरोपी आझाद राजभर अल्पवयीन असल्याची चर्चा होती. मात्र त्याच्या वकिलांनी याचे समर्थन करणारी पुरेशी कागदपत्रेसादर केलेली नाहीत. तर पोलिसांनी राजभरने स्वत:च तो सज्ञान असल्याचे मान्य केले असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)