Join us

देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या सुरक्षेत कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:12 IST

उज्ज्वल निकम आणि शुत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत मात्र वाढदेवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांच्या सुरक्षेत कपातसरकारचा निर्णय ...

उज्ज्वल निकम आणि शुत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत मात्र वाढ

देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांच्या सुरक्षेत कपात

सरकारचा निर्णय : उज्ज्वल निकम आणि शुत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत मात्र वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील बड्या भाजप नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली. तर १६ जणांचे संरक्षण काढण्यात आले असून वकील उज्ज्वल निकम आणि शुत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे.

पोलीस संरक्षणात कपात केल्याबाबत भाजप नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारने सुडाच्या भावनेतून हा निर्णय घेतला आहे, अशी टीका भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे, तर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारने केला असल्याचा आरोप आमदार राम कदम यांनी केला आहे.

सुरक्षेत कपात करण्यात आलेल्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांची झेडप्लस तर राज ठाकरे यांची झेड सुरक्षा काढून त्यांना वायप्लस एस्कॉर्टसह संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. तर रामदास आठवले, एम. एल. तहलीयानी, जी. ए. सानप, अमृता देवेंद्र फडणवीस, दिवीजा फडणवीस, दीपक केसरकर, सूर्यकांत एस. शिंदे, आशिष शेलार, राम नाईक यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. तसेच १६ जणांचे पोलीस संरक्षण काढण्यात आले आहे. तर १३ जणांना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. तर वकील उज्ज्वल निकम आणि शुत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत वाढ करत त्यांना निकम यांना झेड तर सिन्हा यांना वायप्लस एस्कॉर्टसह देण्यात आली आहे.

...

यांचे पोलीस संरक्षण काढले...

भाजपचे माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री चंद्रकांत पाटील, राजकुमार बडोले, शोभाताई फडणवीस, अंबरीष अत्राम, सुधीर मुनगंटीवार, आमदार राम कदम, प्रसाद लाड, माधव भांडारी, मुंबई काँग्रेस माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह, नारायण राणे, मारोतराव कोवासे, शंकर गायकर, आर. व्ही. मोरे, संजय बनसोडे यांचे पोलीस संरक्षण काढण्यात आले आहे.

......

यांना सुरक्षा प्रदान

विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांना वायप्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. तर मंत्री संदीपन भूमारे, अब्दुल सत्तार, दिलीप वळसे-पाटील व सुनील केदार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झीरवल यांना वाय दर्जाची, आमदार प्रकाश शेडगे, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई व राज्य नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, शिवसेना आमदार वैभव नाईक, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.