Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोनोक्लोनल ॲन्टिबॉडीजची किंमत कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मोनोक्लोनल ॲन्टिबॉडीज हे सध्या कोविड उपचारांमध्ये प्रभावी आहे. मात्र, त्याची किंमत ५० ते ६० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मोनोक्लोनल ॲन्टिबॉडीज हे सध्या कोविड उपचारांमध्ये प्रभावी आहे. मात्र, त्याची किंमत ५० ते ६० हजार रुपये प्रति डोस असून, तिसऱ्या लाटेत ५० हजार रुग्णांना जरी हे औषध द्यायचे म्हटले तर ३०० कोटी रुपये लागतील. याचा विचार करून केंद्र सरकारने या औषधांवर किमतीचे निर्बंध आणून त्याची सहज उपलब्धता होईल, हे पाहावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

केंद्र शासनाने देशातील सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक आयोजित केली होती, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केली. यासंदर्भात राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी खर्चिक असलेली मोनोक्लोनल ॲन्टिबॉडीजची किंमत कमी करण्यासाठी केंद्र पातळीवर प्रयत्न करा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती. याबद्दल ‘लोकमत’ने २८ जूनच्या अंकात या संदर्भातील वृत्त देऊन मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते.

मोनोक्लोनल ॲन्टिबॉडीज या कृत्रिम ॲन्टिबॉडीज असून, कोविड रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढून अशा व्यक्ती कोरोनावर लवकर मात करतात. तसेच मोनोक्लोनल ॲन्टिबॉडीजमुळे कोविड रुग्णाला रेमडेसिविर तसेच स्टिरॉइड्स देण्याची तशी आवश्यकता भासत नाही आणि विशेष म्हणजे रुग्ण लवकर बरा होतो. तसेच येणाऱ्या संभाव्य कोविडच्या तिसऱ्या लाटेत मोनोक्लोनल ॲन्टिबॉडीज वेळीच रुग्णाला दिल्यास आपण निश्चितपणे तिसरी लाट थोपवू शकतो, असे मत डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केले.