Join us

भूखंडांवरील पुनर्विकास प्रक्रिया सोपी!

By admin | Updated: August 23, 2015 00:21 IST

महापालिकेच्या मालमत्ता खात्याच्या अखत्यारीतील भाडेकरारांतर्गत देण्यात आलेल्या भूखंडांवरील इमारतींची पुनर्विकास प्रक्रिया राबवायची झाल्यास संबंधिताला मध्यस्थांची मदत

मुंबई : महापालिकेच्या मालमत्ता खात्याच्या अखत्यारीतील भाडेकरारांतर्गत देण्यात आलेल्या भूखंडांवरील इमारतींची पुनर्विकास प्रक्रिया राबवायची झाल्यास संबंधिताला मध्यस्थांची मदत न घेता अर्ज करणे शक्य व्हावे, म्हणून अर्ज करण्याच्या प्रक्रियेचे सुलभीकरण करण्यात येत आहे. यामध्ये अर्ज नमुन्याचे सुलभीकरण व अर्ज केल्यानंतर संबंधित प्रक्रिया पूर्ण होण्याच्या निश्चित कालमर्यादेच्या बाबींचा समावेश आहे.आयुक्त अजय मेहता यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या नागरी सेवा-सुविधांशी संबंधित विविध अर्जांच्या मसुद्यांचे सुलभीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार महापलिकेच्या भाडेकराराअंतर्गत असणाऱ्या भूखंडांवर पुनर्विकास प्रक्रिया राबविण्यासाठी संबंधितांना अर्ज करणे सुलभ व्हावे, या उद्देशाने मालमत्ता खात्याशी संबंधित अर्ज नमुन्यांच्या मसुद्यांचे सुलभीकरण प्रस्तावित करण्यात आले आहे. या अंतर्गत प्रस्तावित मसुदे पालिकेच्या ww.mcgm.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यावर ३ सप्टेंबरपर्यंत नागरिकांनी त्यांच्या सूचना पाठवाव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मालमत्ता (इस्टेट) खात्याच्या अखत्यारीतील भाडेकराराअंतर्गत असणाऱ्या भूखंडांचा पुनर्विकास करण्यासाठी सध्या आवश्यक असणारा दोन पानी अर्ज नमुना रद्द करण्याचे प्रस्तावित आहे. त्याऐवजी कामाच्या स्वरूपानुसार प्रत्येकी केवळ एका पानाचे अत्यंत सुस्पष्ट व सोप्या भाषेतील पाच अर्ज नमुने प्रस्तावित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे अर्ज नमुन्यांमध्ये अर्जासोबत जोडावयाच्या किमान कागदपत्रांचा तपशील व शुल्कांची माहिती असणार आहे. (प्रतिनिधी)नागरिकांसाठी सूचना पाठविण्याचा पत्तासहायक आयुक्त (मालमत्ता), बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, चौथा मजला, विस्तारित इमारत फोर्ट, मुंबई - ४००००१.