Join us  

मुंबईवर पुन्हा धडकणार लाल वादळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 7:37 PM

भाजपा हटावचा नारा : शेतकऱ्यांसह असंघटित कामगार करणार नेतृत्त्व

मुंबई : मुंबईवर पुन्हा एकदा कम्युनिस्टांचे लाल वादळ घोंगाऊ लागले आहे. संपूर्ण कर्जमुक्तीसह स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी अशा विविध मागण्या घेऊन शेतकऱ्यांसह असंघटित कामगारांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्त्वाखाली मंत्रालयावर धडक मोर्चाची हाक दिली आहे. भायखळा येथील राणीबाग मैदानापासून ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता हा मोर्चा काढण्याचा इशारा भाकपचे सहसचिव नामदेव गावडे यांनी दिला आहे.

भाकपने दिलेल्या माहितीनुसार, कर्जमाफी आणि कृषीपंपाचे वीज बिल माफ करण्याची शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. याशिवाय शेतमालाला अद्यापही खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळत नाही आहे. त्यामुळे कर्जबाजारीपणाला कंटाळून कुटुंबासह आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये चांदवड, निफाड, येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये द्राक्ष व्यापाऱ्यांनी बुडवल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित व्यापाऱ्यांविरोधात निफाड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तत्काळ तपास करण्याची मागणीही या मोर्चावेळी केली जाणार आहे.

शेतकऱ्यांसह शेतमजुरांसाठीही शासनाने कायदा तयार करण्याचे आवाहन किसान सभेने केले आहे. शेतकरी व शेतमजुरांना वयाच्या ५८ वर्षांनंतर ५ हजार दरमहा पेंशन देण्याची मागणीही किसान सभेने केली आहे. नारपारच्या पाणी वाटपामध्ये नांदगाव व चांदवड तालुक्याचा समावेश करून समन्यायी पद्धतीने न्याय देण्याचे साकडे शेतकरी मोर्चातून घालणार असल्याचे किसान सभेने स्पष्ट केले.

भाकपची बांधणीभाकप प्रणित शेतकरी, शेतमजुर, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, बांधकाम कामगारांच्या संघटना संपूर्ण ताकदनिशी या मोर्चात सामील होणार आहेत. सर्वच स्तरांवर सर्वसामान्य घटकांचा भ्रमनिरास करणाऱ्या कामगार व शेतकरी वर्गाने या मोर्चाची हाक दिली आहे. भाकपतर्फे केंद्रीय सचिव मंडळाचे सदस्य कॉ. अतुलकुमार अंजान, खासदार विनय विश्वम, डॉ. भालचंद्र कांगो असे विविध नेते मोर्चात दिसतील.

टॅग्स :कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियामुंबईशेतकरीसंप